मुंबई, 26 नोव्हेंबर: गेल्या काही वर्षांत प्रगत तंत्रज्ञानामुळे अनेक बदल झाल्याचं दिसून येतं. पूर्वी मित्र, नातेवाईकांना किंवा एखाद्या महत्त्वाच्या शासकीय, खासगी कामाबाबत निरोप देण्यासाठी टेलिफोन, तार किंवा पत्राचा वापर होत असे; पण कालानुरुप यात बदल झाला आहे. आता ई-मेलच्या (Email) माध्यमातून ही कामं अगदी घरबसल्या आणि सहज करता येतात. ई-मेल म्हटलं, की आपल्या डोळ्यासमोर पहिलं नाव येतं ते जी-मेलचं (Gmail). गुगलची (Google) ही सेवा सर्वाधिक लोकप्रिय मानली जाते. जी-मेल ही आता प्रत्येकाची गरज बनली आहे. जी-मेल अकाउंटला अन्य अकाउंट्स लिंक केलेली असतात. जी-मेल अकाउंट हॅक (Hack) झालं, तर अन्य अकाउंट्सदेखील हॅक होण्याची शक्यता असते. काही वेळा आपलं जी-मेल अकाउंट दुसरं कोणीतरी वापरतंय (Access) असं आपल्याला जाणवतं; पण त्याविषयी आपल्याला निश्चित माहिती नसते. आपलं जी-मेल अकाउंट आपल्या व्यतिरिक्त कोण वापरतं हे जाणून घेता येऊ शकतं. याबाबतची माहिती `आज तक`ने प्रसिद्ध केली आहे. आपल्या व्यतिरिक्त अन्य कोण व्यक्ती आपलं जी-मेल अकाउंट वापरते आहे का, हे जाणून घेणं खूप सोपं आहे. यासाठी तुम्ही कम्प्युटरवरच्या ब्राउझरवरून जी-मेल लॉग इन (Log In) करा. त्यानंतर जी-मेलच्या होमपेजच्या खालच्या बाजूला उजवीकडे जाऊन `डिटेल्स`वर क्लिक करा. तेथे क्लिक केल्यानंतर एक पॉपअप विंडो (Popup Window) सुरू होईल. त्या ठिकाणी तुम्हाला याविषयी माहिती मिळू शकेल. या पॉपअप विंडोमध्ये तुम्हाला तुम्ही न केलेली अॅक्टिव्हिटी दिसली, तर तुमचं जी-मेल कोणी अन्य व्यक्ती अॅक्सेस करत आहे, असं समजावं. त्या ठिकाणी तुम्ही जी-मेल सेशन बंद करू शकता. जी-मेल सेशन बंद केल्यावर सर्व ठिकाणी तुमचं अकाउंट लॉगआउट होईल. या CNG Cars ठरतील चांगला पर्याय, मिळेल 30 किमीहून अधिक मायलेज
तसंच, तुमचं जी-मेल अकाउंट कोठून आणि कोणत्या मशीनवरून अॅक्सेस केलं जात आहे, हेदेखील या पॉपअप विंडोच्या माध्यमातून समजू शकेल. इथे तुम्हाला संबंधित मशीनचा आयपी अॅड्रेस (IP Address) आणि लोकेशनही दिसेल. त्यामुळे अन्य व्यक्ती तुमचं जी-मेल अकाउंट कोणत्या ठिकाणाहून अॅक्सेस करत आहे, हेदेखील समजेल. तथापि, तुम्ही वेगवेगळ्या लॅपटॉप किंवा लोकेशनवरून जीमेलमध्ये लॉगिन केलेलं नाही ना, हेदेखील पाहावं लागेल. तसं असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही.
याशिवाय तुमच्या अकाउंटच्या MyActivity या सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही ही माहिती घेऊ शकता. या सर्व गोष्टींचा वापर करून तुम्ही तुमचं जी-मेल अकाउंट सुरक्षित ठेवू शकता.