सुरत, 25 फेब्रुवारी : गुजरातमधील गुजरात टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीच्या (Gujarat Technological University) 2 विद्यार्थ्यांनी एक किट तयार केलं आहे. या विद्यार्थ्यांनी बॅटरीवर (battery-operated kit) चालणारं हे किट तयार केलं असून यामुळे इलेक्ट्रिक मोटरसायकलचं मायलेज वाढण्यास मदत होणार आहे. या विद्यार्थ्यांच्या संशोधनाला युनिव्हर्सिटीने अतिशय उपयोगी म्हटलं असून यामुळे वाहनांसाठी ऊर्जेचा उत्तम स्रोत तयार होणार असल्याचंही म्हटलंय. तसंच अपारंपरिक उर्जा स्त्रोतांच्या वापरामध्ये विद्यापीठानेही याला महत्त्वपूर्ण प्रगती असल्याचं म्हटलं आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीमध्ये विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या किटमुळे दिलासा मिळणार आहे. युनिव्हर्सिटीच्या (GTU) अर्पित चौहान आणि कार्तिक अत्रेया या दोन विद्यार्थ्यांनी हे बॅटरीवरील किट तयार केलं आहे. या नवीन बॅटरी किटमुळे जवळपास 80 किलोमीटरचं मायलेज मिळणार आहे. यासाठी केवळ 25 पैसे प्रति किलोमीटर इतका खर्च येणार असून लिथियम आणि लेडच्या बॅटरीच्या साहाय्याने मोटारसायकल चालवता येणार आहे. याचबरोबर इलेक्ट्रिक वाहनांच्या ध्वनी प्रदूषणामध्ये देखील कपात होण्यास मदत होणार आहे. या बॅटरीचा वापर केल्याने 10 ते 12 डेसिबलपर्यंत आवाज कमी होणार असल्याचं म्हटलं आहे.
(वाचा - भारतातील सर्वात स्वस्त 5G फोन लाँच; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स )
अहमदाबाद मिररमध्ये आलेल्या वृत्तानुसार, गुजरात टेक्नॉलॉजीकल युनिव्हर्सिटीचे (GTU) कुलगुरू प्राध्यापक नवीन शेठ म्हणाले की, विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या पथकाने ऑटो रिक्षा, ट्रॅक्टर आणि मोटारीसाठी वापरल्या जाणार्या अशाच किटच्या विकासासाठी संशोधन कार्य सुरू केलं आहे. हे किट तयार करणाऱ्या अर्पित आणि कार्तिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी यावर सहा वर्ष संशोधन केलं आहे. मोटारसायकलसाठी या प्रकारचं किट तयार केल्यानंतर आता ते कार, ट्रॅक्टर, ऑटो-रिक्षा आणि सायकलसाठी या पद्धतीचं किट विकसित करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे लवकरच या वाहनांसाठी देखील अशाच पद्धतीचे किट मिळण्याची शक्यता आहे.
(वाचा - पर्यायी इंधन म्हणून हायड्रोजन कितपत योग्य? घ्या जाणून याचे फायदे-तोटे! )
भारत आत्मनिर्भर होत असतानाच अपारंपरिक उर्जा वापरावरही जोर देत आहे. त्यामुळे देशात बॅटरीवरील वाहनं वापरणं सुरू झालं आहे. या वाहनांची अडचण हीच आहे की त्यांची बॅटरी सारखी चार्ज करावी लागते. त्यामुळे गाडीचं मायलेज कमी मिळतं. पण या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या बॅटरीचा व्यावसायिक उपयोग सुरू झाला, तर सर्वांनाच फायदा होऊ शकतो.