नवी दिल्ली, 23 जानेवारी : स्मार्टफोन (Smartphone) ही आता दैनंदिन गरजेची वस्तू झाली आहे. बहुतांश गोष्टी ऑनलाइन (Online) झाल्यानं स्मार्टफोनचं महत्त्व वाढलं आहे. स्मार्टफोन वापरण्याकरता सिम कार्डची (Sim Card) गरज असते. कारण सिम कार्डच्या माध्यमातून तुम्हाला कॉलिंग, डेटासारख्या सुविधा टेलिकॉम कंपन्यांकडून पुरवल्या जातात. काळानुरूप सिम कार्डमध्ये अनेक बदल होत गेले. सिम कार्ड आकारानं लहान होत गेलं. सध्याच्या काळात नॅनो सिमकार्ड (Nano Sim Card) प्रचलित आहे, मात्र सिम कार्डमधलं अपडेशन इथंच थांबलेलं नाही. कारण आता लवकरच आयसिम (iSim) हा सिमकार्डचा नवा प्रकार येणार आहे. आयसिम नेमकं कसं आहे?
क्वालकॉम (Qualcomm) या जगप्रसिद्ध चिप निर्मात्या कंपनीने व्होडाफोन (Vodafone) आणि थेल्स या कंपन्यांच्या मदतीनं आयसिमची निर्मिती केली आहे. त्यामुळे सध्या वापरात असलेल्या नॅनो सिमची जागा लवकरच नवतंत्रज्ञानाने परिपूर्ण असलेलं आयसिम घेणार आहे. हे सिम युजर्ससाठी अधिक फायदेशीर ठरणार असल्याचा दावादेखील करण्यात येत आहे.
`डिजिट`च्या अहवालानुसार, क्वालकॉमने आयसिम असलेला स्मार्टफोन सादर केला आहे. या फोनमध्ये इंटिग्रेटेड सिम तंत्राचा (Integrated Sim Technology) वापर करण्यात आला आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर फोनमधल्या प्रोसेसरमध्ये (Processer) हे सिम बसवण्यात आलं आहे. त्यामुळे आता फोनमध्ये इनबिल्ट (Inbuilt) सिम असेल. फोनसोबत वेगळं सिम घेण्याची गरज भासणार नाही.
आयसिममुळे बऱ्याच गोष्टी बदलणार आहेत. सध्या वापरात असलेलं नॅनो सिम बाद ठरणार असल्याने आणि आयसिम स्मार्टफोनमध्ये इनबिल्ट असल्यानं प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. या सिममुळे ग्राहकाला चांगलं नेटवर्क कव्हरेज मिळेल. तसंच कॉल करतेवेळी समस्यांचा सामना करावा लागणार नाही, असा दावा करण्यात आला आहे.
क्वालकॉम या चिप मेकर कंपनीने युरोपमध्ये या सिमचं प्रात्यक्षिक सादर केलं आणि ते यशस्वीदेखील झालं. त्या वेळी कंपनीनं या सिमचा वापर सॅमसंगच्या (Samsung) गॅलेक्सी झेड फ्लिप 5G मॉडेलमध्ये केला. कंपनीनं प्रारंभिक प्रक्रिया पूर्ण केली असून, लवकरच हे सिम ग्राहकांना उपलब्ध होईल, असा दावा माध्यमांनी केला आहे.
आयसिम, ई-सिम (E-sim) आणि फिजिकल सिममध्ये (Physical Sim) खूप फरक आहे. फिजिकल सिमचा मोबाइल फोन्समध्ये वापर 1996 मध्ये सुरू झाला. सिमसाठी मोबाइल कंपन्यांना फोनमध्ये एक वेगळा स्लॉट द्यावा लागत होता. बहुतांश फोन्समध्ये दोन सिम कार्डसाठी स्लॉट दिले जाऊ लागले. अॅपल कंपनी त्यांच्या फोन्समध्ये एकच स्लॉट देत होती.
ई-सिम हे एक व्हर्च्युअल (Virtual) सिमकार्ड आहे. याचा वापर 2016 मध्ये सुरू झाला. ई-सिम स्मार्टफोन्सच्या मदर बोर्डवर बसवलं जातं. फिजिकल सिमच्या तुलनेत हे खूप वेगळं असतं. तुम्ही हे सिम खरेदी केलं, तर संबंधित टेलिकॉम कंपनी हे ओव्हर-द-एअर अॅक्टिव्हेट करते. या सिममध्ये सर्वसामान्य सिम कार्डसारखेच फीचर्स असतात.
आयसिम हे सर्वांत नवं तंत्रज्ञान आहे. स्मार्टफोनच्या प्रोसेसरमध्ये हे सिम बसवण्यात येतं. हा प्रयोग यशस्वी झाल्याचा दावा क्वालकॉमनं केला आहे.
प्रोसेसरमध्ये बसवण्यात आलेलं आयसिम हे युजर्ससाठी उपयुक्त ठरणार आहे. यामुळे सिम हरवण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही. हे पूर्णतः डिजिटल असेल. या सिममुळे डिव्हाइसचा परफॉर्मन्स आणि मेमरी वाढेल, असा दावा क्वालकॉमनं केला आहे.
हे सिम केवळ स्मार्टफोनमध्येच नाही, तर स्मार्टवॉच, लॅपटॉप किंवा अन्य कोणत्याही डिव्हाइसमध्ये लावता येईल. या सिममुळे स्मार्टफोनमधल्या सिमस्लॉटची जागा एखाद्या नव्या इनोव्हेशनसाठी वापरली जाईल. जादा जागा उपलब्ध झाल्याने स्मार्टफोनच्या डिझाइन्समध्ये अनेक बदल पाहायला मिळतील.
नव्या आयसिममुळे नेटवर्क प्रोव्हायडर कंपन्यांचा अतिरिक्त खर्च कमी होणार आहे. फिजिकल सिम उपलब्ध करून देण्याचा त्रास कमी होईल. या सिमच्या सर्व गोष्टी ऑनलाइन असतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sim, Smartphone, Tech news