नवी दिल्ली 27 सप्टेंबर : व्यक्ती ज्या दिवशी जन्माला येते तो दिवस त्या व्यक्तीचा जन्मदिवस किंवा वाढदिवस समजला जातो. ही बाब फक्त व्यक्तींनाचं नाही तर वस्तूंना देखील लागू होते. ज्या दिवशी ती वस्तू तयार होते तो दिवस तिचा जन्मदिवस मानला जातो. तसंच एखादी वस्तू आपण विकत घरी आणली ती तारीखही आपण त्या वस्तूचा वाढदिवस म्हणून साजरी करतो. मग ऑनलाईन जगाचा विचार केला तर एखादी वेबसाईट किंवा एखादी सेवा (Website or Online Service) जेव्हा लोकांना वापरासाठी उपलब्ध झाली तो त्या वेबसाईटचा किंवा सेवेचा वाढदिवस असायला हवा. या अलिखित नियमानुसार आज गुगल या सेवेचा वाढदिवस (Google birthday) आहे. आज, २७ सप्टेंबरला गुगल आपला 23वा वाढदिवस साजरा करत आहे. खास डूडल तयार करून, जगभरातील महत्त्वाच्या घटना आणि व्यक्तींबाबत आदर व्यक्त करण्याची गुगलची अनोखी शैली आहे. आपल्या वाढदिवसानिमित्त देखील गुगलने एक खास डूडल (Google birthday doodle) तयार करून ते शेअर केलं आहे. याबाबतचं वृत्त दी इंडियन एक्सप्रेसने दिलं आहे.
आपण दिवसभरात अनेक गोष्टींची माहिती घेण्यासाठी गुगलचा वापर करतो. कदाचित सध्या अशी एकही गोष्ट नसेल जी गुगलवर उपलब्ध नाही. आपल्याला पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यास ‘गुगल बाबा’ समर्थ आहे. मात्र, गुगलची निर्मिती कशी आणि केव्हा झाली! याबाबत अनेकांना माहिती नाही. चला तर आपण गुगलच्या जाणून घेऊया गुगलच्या जन्माची गोष्ट.
Google चं नवं अपडेट! तुमच्या Android Phone मध्ये मिळणार हे जबरदस्त फीचर्स
असा झाला गुगलचा जन्म
सध्या गुगल हे जगातील सर्वांत मोठं सर्च इंजिन आहे. कॅलिफोर्नियातील स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीतील दोन विद्यार्थ्यांच्या मनात सर्वप्रथम याच्या निर्मितीची कल्पना आली होती. आपल्या कल्पनेवर काम करून १९९८मध्ये लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन यांनी या सर्च इंजिनची (Search Engine) निर्मिती केली. आता जरी हे सर्च इंजिन 'गुगल' नावाने जगप्रसिद्ध असले तरी हे काही त्याचं मूळ नाव नाही! त्याच्या निर्मात्यांनी सुरुवातीला त्याला 'बॅकरब' हे नाव दिलं होतं. नंतर त्याचं 'गुगल' या नावाने बारसं करण्यात आलं. सध्या मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटरमध्ये गुगल वापरता येतं.
एका जन्माच्या अनेक तारखा!
आपल्या वाढदिवसाची तारीख ठरलेली असते. गुगलच्या बाबतीत मात्र, हे लागू झालं नाही. आतापर्यंत चार वेगवेगळ्या दिवशी गुगलचा वाढदिवस साजरा झालेला आहे. ७ सप्टेंबर २००५ ला पहिल्यांदा गुगलचा वाढदिवस (Google’s First Birth Day Celebration) साजरा झाला होता. त्यानंतर ही तारीख बदलून कधी ८ सप्टेंबर झाली तर कधी २६ सप्टेंबर. सध्या २७ सप्टेंबर हा दिवस गुगलचा वाढदिवस म्हणून साजरा केला जातो. यामागे एक खास कारणदेखील आहे. २७ सप्टेंबर या दिवशी गुगलने पेजेस सर्च करण्याचा विक्रम केला होता. त्यामुळे हाच दिवस वाढदिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय कंपनी व्यवस्थापनाने घेतला.
फ्लिपकार्टनंतर अॅमेझॉनने बदलली तारीख, दोन्ही प्लॅटफॉर्मवर कधी आहे धमाकेदार सेल?
गुगलने स्थानिक भाषाही केल्या आत्मसात
बदल ही काळाची गरज मानली जाते. बदलत्या काळानुसार गुगलने देखील आपल्यात अनेक सुधारणा घडवून आणल्या आहेत. अनेक नवीन गोष्टी आत्मसात केल्या आहेत. स्थानिक भाषांचा (Local Languages) समावेश करून घेणं, हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा बदल म्हणता येईल. सध्या जगभरातील १००पेक्षा अधिक स्थानिक भाषांमध्ये गुगलवर माहिती उपलब्ध होते. यामध्ये भारतीय अनेक भाषांचा देखील समावेश आहे.
गुगलचा वापर इतका सरावाचा झाला आहे की थोडं क्षणभर थांबून हे कुणी सुरू केलं हे जाणून घ्यायची उसंतही आपल्याला नसते. पण आता ही माहिती आम्ही दिली आहे. त्यामुळे पुढच्यावेळी गुगल वापरताना तुम्हाला त्याच्या वाढदिवसाची तारीख नक्की आठवेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Birthday celebration, Google