नवी दिल्ली, 8 मे : डिजीटल पेमेंट प्लॅटफॉर्म पेटीएमने (Paytm) कोविड-19 वॅक्सिन फाइंडर टूल (COVID-19 Vaccine Finder) लाँच केलं आहे. या टूलद्वारे युजर्स वॅक्सिनेशनसाठी स्लॉटबाबतची माहिती घेऊ शकतात. या प्लॅटफॉर्मद्वारे एखाद्या विशिष्ट तारखेसाठी लसीकरण स्लॉटची (vaccination slots) उपलब्धता तपासण्यात नागरिकांना मदत होईल, असं कंपनीने आपल्या निवेदनात म्हटलं आहे.
भारत सरकारने 1 मेपासून 18 ते 45 वयोगटातील लोकांसाठी वॅक्सिनेशन ड्राईव्ह सुरू केलं आहे. परंतु लसीची उपलब्धता कमी असल्याने, लसीकरणासाठीचा स्लॉट उपलब्ध होत नाही. पेटीएमच्या या टूलद्वारे युजर्स केवळ स्लॉटबाबतची माहिती मिळवू शकतात. परंतु लसीकरणासाठी मात्र कोविन किंवा आरोग्य सेतू अॅपचाच वापर करावा लागेल, अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.
असा करता येणार वापर -
- पेटीएमच्या या टूलचा वापर करण्यासाठी युजर्सला Paytm App च्या वर दिलेल्या मिनी अॅप स्टोर सेक्शनमध्ये वॅक्सिन फाइंडरवर क्लिक करावं लागेल.
- त्यानंतर तुमच्या भागाचा पीन कोड नंबर टाकावा लागेल.
- तुमचं वय सिलेक्ट करावं लागेल.
- त्यानंतर चेक अव्हेलेबलिटीवर क्लिक करावं लागेल.
- या प्रोसेसनंतर तुम्हाला तुमच्या भागात वॅक्सिन आहे की, नाही किंवा कधी उपलब्ध होईल याची माहिती मिळेल.
हे नवं फिचर पेटीएम फाउंडर विजय शेखर शर्मा यांनी एका पोस्टद्वारे ट्विटरवर शेअर केलं आहे. ऑटोमेटेड प्रोसेसद्वारे वॅक्सिन स्लॉटबाबत, लोकांना वॅक्सिन उपलब्ध आहे की नाही हे समजू शकेल, असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.