नवी दिल्ली, 21 डिसेंबर : पाकिस्तान भारतात दहशतवाद आणि अविश्वास पसरवण्याचा प्रयत्न करत आहे. भारतीय लष्कराने (Indian Army) पाकिस्तान दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्यानंतर आता पाकिस्तान (Pakistan) इंटरनेटद्वारे भारतात (India) दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. पाकिस्तानच्या या कृत्यानंतर भारताने पहिल्यांदाच 2 न्यूज वेबसाइट आणि 20 YouTube चॅनेल ब्लॉक करण्याचे आदेश दिले आहेत. या चॅनेलच्या माध्यमातून पाकिस्तान भारतात खोट्या बातम्या आणि अफवा पसरवण्याचं काम करत होता. YouTube चॅनेल बॅन करण्याबाबत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने यूट्यूबला लेखी आदेश जारी केले आहेत.
इंटरनेटच्या माध्यमातून भारतविरोधी अजेंडा चालवणाऱ्यांवर सरकार आता कठोर भूमिका घेत आहे. मल्टीनॅशनल कंपन्या इंटरनेट मीडियाबाबत कठोर नियम बनवत असताना काही लोक याचा चुकीचा वापर करत आहेत. सरकारला मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानातील काही लोक यूट्यूबच्या माध्यमातून भारतविरोधी आणि खोट्या बातम्या पसरवण्याचं काम करत आहेत. 'नया पाकिस्तान ग्रुप' अशा नावाचे 15 यूट्यूब चॅनेल असून हे सर्व चॅनेल भारतावर केंद्रीत आहेत. या सर्व यूट्यूब चॅनेलवर भारतविरोधी बातम्या प्रसारित करण्याचं काम केलं जातं.
हे यूट्यूब चॅनेल बातम्यांच्या नावाखाली भारताची प्रतिमा खराब करण्याचं आणि जगासमोर भारताबाबत खोटं पसरवण्याचं काम करत आहेत. हे खोटं सत्य म्हणून दाखवण्यसाठी काही वाहिन्यांनी पाकिस्तानी अँकरलाही आपल्या टीमचा भाग बनवलं आहे. हे सर्व अँकर तिथल्या अनेक मोठ्या वृत्तवाहिन्यांमध्ये काम करतात. खोट्याला सत्य असल्याचं सांगणं हाच त्यांचा उद्देश आहे.
या यूट्यूब चॅनेलवर प्रसारित केलेल्या व्हिडीओ आणि फोटोग्राफिक सामग्रीमध्ये पीएम मोदी इंपोज इमरजेंसी, अनुच्छेद 370 पुन्हा आणणं, तालिबान लष्कर आणि भारताचे संबंध असे अनेक खोटे दावे केले आहेत. असे दावे करुन भारतात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सरकारकडून जे पोर्टल हटवण्याबाबत सांगण्यात आलं आहे, त्या पोर्टलमध्ये 'नया पाकिस्तान ग्रुप'चा समावेश आहे, जो YouTube वर 15 हून अधिक चॅनेल चालवतो आणि यासह एक मिलियनहून अधिक लोक जोडलेले आहेत.
सखोल तपास केल्यानंतर आणि ठोस पुरावे गोळा केल्यानंतरच सरकारने त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांना तातडीने ब्लॉक करण्याचे आदेश यूट्यूबला दिल्याचं सांगण्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pakistan, Tech news, Youtube, YouTube Channel