नवी दिल्ली, 4 डिसेंबर : केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (CCPA) घरगुती वापराच्या बनावट उत्पादनांविरोधात मोहिम तीव्र केली आहे. प्रेशर कुकर, टू-व्हिलर हेल्मेट आणि बनावट IS मार्क असलेल्या स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरची विक्री करणाऱ्यांविरोधात मोहिम राबवण्यात येत असल्याचं ग्राहक संरक्षण नियामकाने बुधवारी सांगितलं. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने याआधीच Amazon, Flipkart आणि Paytm सह पाच ई-कॉमर्स कंपन्यांना याबाबत नोटिस जारी केली आहे.
केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाचे मुख्य आयुक्त निधि खरे यांनी सांगितलं, की या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर अनेक विक्रेते अशा प्रेशर कुकरची विक्री करत आहेत, जे भारतीय मानक ब्युरोच्या (BIS) नियमांची पूर्तता करत नाहीत. याच पार्श्वभूमीवर CCPA ने पाच ई-कॉमर्स कंपन्या आणि अनेक विक्रेत्यांना भारतीय मानक ब्युरोच्या नियमांचं पालन न करणाऱ्या प्रेशर कुकरच्या विक्रीसाठी नोटिस पाठवली आहे.
खरे यांनी सांगितलं, की आम्ही केवळ ऑफलाइन मार्केटमध्येच नाही, तर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरही बनावट उत्पादनं विकणाऱ्यांविरोधात पाळत ठेवून अंमलबजावणी तीव्र केली आहे. या देशव्यापी मोहिमेअंतर्गत आम्ही तीन उत्पादनं प्रेशर कुकर, दुचाकीचे हेल्मेट आणि LPG सिलेंडर ओळखले आहेत.
बाजारात अशा बनावट उत्पादनांची विक्री रोखण्यासाठी CCPA ने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना ज्या कंपन्यांविरुद्ध ग्राहक हक्कांचे उल्लंघन केल्याच्या तक्रारी आल्या आहेत, त्यांची चौकशी करण्याचं सांगितलं आहे.
BIS मार्क सामान खरेदीचा सल्ला -
- केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण अर्थात CCPA ने ग्राहकांना स्वत:च्या सुरक्षेसाठी उत्पादनं खरेदी करताना BIS चं भारतीय मानक चिन्ह तपासण्याचं आवाहन केलं आहे. वेबसाइटवरुन खरेदी करताना उत्पादनाच्या फीचर्समध्ये IS मार्क तपासण्याचा सल्ला दिला आहे.
- प्रेशर कुकर, हेल्मेट आणि LPG सिलेंडर IS मार्कशिवाय विकता येणार नाही याची ग्राहकांनीही माहिती ठेवणं गरजेचं आहे.
- उदा. हेल्मेटवर BIS मार्क IS 4151:2015 आणि प्रेशर कुकरवर IS 2347:2017 मार्क असणं गरजेचं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Tech news