नवी दिल्ली, 4 डिसेंबर : गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किमतीमध्ये (Petrol-diesel prices) सातत्याने वाढ होत आहे. देशातल्या सर्व वाहनमालकांना याची झळ बसत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरीदेखील (Nitin Gadkari) याला अपवाद कसे असतील? इंधनाच्या इतर पर्यायांचं कायम समर्थन करणाऱ्या गडकरींनी आता पेट्रोल-डिझेलपासून आपली सुटका करून घेतली आहे. त्यांनी अलीकडेच एक नवीन कार (Car) खरेदी केली आहे. या कारचं वैशिष्ट्य म्हणजे ती पेट्रोल, डिझेल किंवा सीएनजीवर (CNG) चालत नाही. गडकरींची नवी कार हायड्रोजन (Hydrogen) इंधनावर चालते. आपण दिल्लीमध्ये या कारचा वापर करणार आहोत जेणेकरून लोकांचा हायड्रोजन इंधनावर (Hydrogen Car) विश्वास बसेल, अशी माहिती गडकरी यांनी दिली आहे.
नितीन गडकरी नेहमी पेट्रोलचा वापर कमी करण्याबाबत बोलत असतात. भारताने आगामी काळात पेट्रोलवर कमी प्रमाणात अवलंबून राहावं, अशी त्यांची कल्पना आहे. यासाठी त्यांनी अनेकदा इंधनांचे विविध पर्यायदेखील समोर मांडलेले आहेत. सांडपाणी आणि शहरातल्या कचर्यापासून बनवल्या जाणाऱ्या ग्रीन हायड्रोजनवर (Green hydrogen) बस, ट्रक आणि कार्स चालवल्या जाव्यात अशी त्यांची योजना आहे. 2 डिसेंबर रोजी 6 व्या नॅशनल फायनान्शियल इन्क्लुजन समिटदरम्यान (National Financial Inclusion Summit) त्यांनी याबद्दल माहिती दिली.
याच कार्यक्रमात त्यांनी आपल्या नवीन गाडीचीदेखील माहिती दिली. गडकरींनी एक पायलट प्रोजेक्ट कार विकत घेतली आहे. ही कार फरिदाबादमधल्या ऑइल रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये (Oil Research Institute) तयार केलेल्या ग्रीन हायड्रोजनवर चालते. नागरिकांच्या मनात हायड्रोजन इंधनाबाबत विश्वास निर्माण व्हावा यासाठी गडकरी दिल्लीमध्ये ही गाडी वापरणार आहेत. नोव्हेंबर महिन्यात झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान गडकरी म्हणाले होते, की येत्या दोन-तीन दिवसांत कार कंपन्यांसाठी फ्लेक्स-फ्युएल इंजिन (Flex-fuel engine) बंधनकारक करण्याचा आदेश जारी करण्यात येणार आहे. फ्लेक्स-फ्युएल इंजिनच्या कारमध्ये एकापेक्षा जास्त इंधनांचा वापर शक्य आहे.
भारत दरवर्षी 8 लाख कोटी रुपयांची पेट्रोलियम उत्पादनं आयात करतो. भारत पेट्रोलियम उत्पादनांवर अवलंबून राहिल्यास येत्या पाच वर्षांत आयातीचं बिल 25 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढेल, अशी माहिती याच आठवड्यात एका कार्यक्रमात बोलताना गडकरींनी दिली होती. 'मी येत्या दोन-तीन दिवसांत पेट्रोलियम आयात कमी करण्याच्या आदेशावर स्वाक्षरी करणार आहे. या अंतर्गत, कार उत्पादकांना फ्लेक्स-फ्युएल इंजिनच्या कार्स आणणं बंधनकारक असेल,' असंही गडकरी म्हणाले होते.
आता गडकरींनी स्वत: हायड्रोजनवर चालणारी कार घेतली आहे आणि तिचा ते वापरदेखील करणार आहेत. लोकांच्या मनात पर्यायी इंधनांबाबत विश्वास तयार व्हावा, यासाठी गडकरी स्वत: प्रयत्न करणार आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Nitin gadkari