नवी दिल्ली, 30 जून: डेटा गोपनीयता आणि सुरक्षेसंबंधी एका बैठकीत गुगलकडून (Google) मोठा खुलासा करण्यात आला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, OK Google बोलल्यानंतर गुगल असिस्टेंटला (Google Assistant) जे काही विचारलं जात, त्याचं रेकॉर्डिंग गुगलचे कर्मचारीही (Google Employees) ऐकत असल्याचं गुगलकडून या बैठकीत सांगण्यात आलं आहे. माहिती तंत्रज्ञान स्थायी समितीला गुगलने ही माहिती दिली आहे. ही माहिती आधीच पब्लिक डोमेनवर असून कंपनीने काही वर्षांपूर्वी स्वत:चं याबाबत सागंतिलं होतं.
शशी थरूर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने हे युजर्सच्या गोपनीयतेचं गंभीर उल्लंघन असल्याचं म्हटलं आहे. यावर समितीकडून लवकरच अहवाल तयार करुन सरकारला काही सूचना देण्यात येणार आहेत. गुगल असिस्टेंट सुरू करुन OK Google बोलल्यानंतर पुढील जे काही संभाषण होतं, ते गुगलचे कर्मचारी ऐकत असल्याचं गुगलने मान्य केलं असल्याचं, पॅनेलमधील सुत्रांकडून सांगण्यात आलं आहे.
2019 मध्ये गुगल प्रोडक्ट मॅनेजर डेव्हिड मोनसी यांनी ही बाब एका ब्लॉग पोस्टमध्ये मान्य केली होती. त्यांचे भाषा एक्सपर्ट्स रेकॉर्डिंग ऐकतात, जेणेकरुन गुगल स्पीच सर्विस (Google Speech Service) अधिक चांगली करण्यात मदत होईल. स्पीच रेक्गनेशन अधिक चांगलं करण्यासाठी कर्मचारी हे रेकॉर्डिंग ऐकत असल्याचा दावा गुगलकडून करण्यात आला आहे. याआधी अमेरिकेतही याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले असून काही ठिकाणी यासंबंधी खटलाही चालला आहे.
याबाबत गुगलने असंही स्पष्टीकरण दिलं, की खासगी माहिती ऐकली जात नाही. केवळ सामान्य बोलणं रेकॉर्ड केलं जात. परंतु या दोघांमध्ये हा फरक कसा केला जातो, याबाबत गुगलकडून सांगण्यात आलेलं नाही.
गुगलने आपल्या अटींमध्ये गुगल स्मार्ट स्पीकर्स आणि गुगल असिस्टेंटद्वारे बोलणं रेकॉर्ड केल्याचं सांगितलं असलं, तरी युजर्सचं रेकॉर्डिंग त्यांचे कर्मचारीही ऐकत असल्याची बाब अटींमध्ये सांगितली नसल्याचा मुद्दा बैठकीतील एका सदस्याने मांडला आहे. आता सरकार याबाबत काय पाउलं उचलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Google, Tech news, Technology