नवी दिल्ली, 1 सप्टेंबर : जीमेल अकाउंट (Gmail Account) युजर्ससाठी एका नव्या ईमेल फ्रॉडने, नवी समस्या निर्माण केली आहे. युजर्सला एका धोकादायक जीमेल स्पॅमपासून (Spam) सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. हा ईमेल फ्रॉड भारतासह जगभरात होतो आहे, यामुळे युजर्सच्या समस्या वाढत आहेत. युजरची फसवणूक करण्यासाठी या नव्या पद्धतीचा वापर केला जात आहे.
हा जीमेल फ्रॉड करण्यासाठी स्कॅमर्स आता असे मेल पाठवतात, जे अॅमेझॉन किंवा PayPal सारख्या मोठ्या कंपन्यांच्या नावे येतात. या ईमेलमध्ये युजरच्या अकाउंटवर नुकतीचं मोठी खरेदी केल्याचा दावा केला जातो. ही खरेदी रोखण्याचा कोणताही उपाय नाही. ही ऑर्डर कॅन्सल करण्यासाठी युजरला केवळ फोन कॉल करावा लागेल, असं त्या मेलमध्ये सांगितलं जातं. या मेलमध्ये एक फोन नंबर सामिल असतो. या मेलमध्ये लिहिलेलं असतं, की जर तुम्ही अद्याप याची खरेदी केली नसेल, तर आम्हाला कॉल करा. तुम्हाला फोनवर कनेक्ट केलं जाईल, असं सांगितलं जातं.
फोनशी कनेक्ट झाल्यानंतर फ्रॉड व्यक्ती अकाउंटची माहिती, बँकेची माहिती आणि पासवर्ड विचारतो. अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करण्याचं सांगितलं जातं. पण पैसे युजरच्या अकाउंटमध्ये न जाता बनावट अकाउंटमध्ये ते पैसे ट्रान्सफर होतात.
या फ्रॉडला Vishing Fraud म्हटलं जातं. Kaspersky ने दिलेल्या माहितीनुसार, फ्रॉड करण्यासाठी स्कॅमर्सकडून युजर्सला नकली, बनावट लिंक पाठवण्याची मोठी समस्या आली आहे. अनेक स्पॅम ईमेलची माहिती मिळाली असून, हे ईमेल बड्या कंपन्यांच्या नावाने पाठवले जात आहे. इतर फ्रॉडप्रमाणे यातही हा ईमेल अधिकृत फॉन्ट आणि लोगोचा वापर केलेल्या मेसेजसह येतो. त्यामुळे युजरला हा मेल अगदी खराच असल्याचं वाटू शकतं. त्यामुळे मेल किंवा इतर ठिकाणीही आलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नये.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.