नवी दिल्ली, 13 जानेवारी : विना फास्टॅग (FASTag) वाहनांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. विना फास्टॅग वाहनं आता 15 फेब्रुवारीपर्यंत नॅशनल हायवे टोल प्लाजावर (Toll Plaza) पैसे भरुन प्रवास करू शकणार आहेत. मात्र 16 फेब्रुवारीपासून सर्व टोल प्लाजावर फास्टॅग अनिवार्य करण्यात आला आहे.
याआधी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून 1 जानेवारीपासून टोल प्लाझावर (Toll Plaza) कॅश कलेक्शन बंद करण्याचे आदेश दिले होते. सरकारने विना फास्टॅग वाहनांविरोधात कडक कारवाई करण्याची तयारी दर्शवली आहे, ज्यामुळे सर्व फोर व्हिलर वाहनांना फास्टॅग लावला जाईल. सरकारने यापूर्वी नॅशनल हायवे टोल प्लाजावर 1 जानेवारीपासून कॅश लेन संपुष्ठात आणण्याचा निर्णय घेतला होता. परंतु लोकांना येणाऱ्या समस्या पाहता ही तारीख 15 फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी आणि टोल प्लाझावर गाड्यांच्या लांबच लांब रांगांपासून सुटका होण्यासाठी फास्टॅग सिस्टम आवश्यक आहे.
टू-व्हिलर वगळता, कार, बस, ट्रक यासारख्या खासगी आणि कमर्शियल वाहनांना टोल प्लाजावरुन प्रवास करताना, फास्टॅग लावणं अनिवार्य आहे. वाहन चालकांकडे फास्टॅग खरेदी करण्याचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. फास्टॅग देशभरात नॅशनल हायवेच्या कोणत्याही टोल प्लाजावर खरेदी केला जाऊ शकतो. यासाठी आपल्या वाहनाची आरसी दाखवावी लागेल. त्याशिवाय फास्टॅग बँक, अॅमेझॉन, पेटीएम, एयरटेल पेमेंट आणि बँकेकडूनही खरेदी करता येतो.
किती आहे फास्टॅगची किंमत -
फास्टॅगची किंमत तो कुठून खरेदी केला जातो, यावर अवलंबून आहे. बँकेची फास्टॅगची फी आणि सिक्योरिटी डिपॉजिटची वेगवेगळी पॉलिसी आहे. कारसाठी पेटीएममधून फास्टॅग 500 रुपयांत खरेदी करता येतो. यात 250 रुपये रिफंडेबल सिक्योरिटी डिपॉजिट आणि 150 रुपये मिनिमम बॅलेन्स मिळेल.
तसंच आयसीआयसीआय बँकेतून (ICICI) फास्टॅग खरेदी केल्यास, 100 रुपये फी आणि 200 रुपये डिपॉजिट अमाउंट द्यावी लागेल. यात 200 रुपये बँलेन्स ठेवावा लागेल.
कसं कराल रिचार्ज -
बँकेतून फास्टॅग खरेदी केला असल्यास, त्याद्वारे तयार करण्यात आलेलं फास्टॅग वॉलेट मोबाईलमध्ये डाउनलोड करा आणि इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डने ते रिचार्ज करा. तसंच पेटीएम, फोन पे, गुगल पे, अॅमेझॉन पे यासारख्या मोबाईल वॉलेटनेही रिचार्ज करता येतं.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) दिलेल्या माहितीनुसार, FASTag ज्या ठिकाणी खरेदी केला आहे, त्याच ठिकाणी तो रिचार्ज करा. म्हणजेच ज्या बँकेतून तो खरेदी केला आहे, त्याच बँकेतून तो रिचार्ज करावा लागेल. ग्राहकाने FASTag एका बँकेतून खरेदी केला आणि दुसऱ्या बँकेतून रिचार्ज केल्यास, त्याला 2.5 टक्के लोडिंग चार्ज द्यावा लागेल. म्हणजेच 1 हजार रुपयांचा रिचार्ज केल्यास, त्यावर 25 रुपये अधिक द्यावे लागतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Fastag, Toll plaza