नवी दिल्ली, 16 जून : एका भारतीय हॅकरला फेसबुकने (Facebook) 22 लाख रुपयांचं बक्षिस दिलं आहे. मयूर नावाच्या एका भारतीय डेव्हलपरने फेसबुकचा प्लॅटफॉर्म असलेल्या इन्स्टाग्राममध्ये (Instagram) गंभीर त्रुटी सांगितली. या त्रुटीमुळे कोणीही इन्स्टाग्रामवर कोणाचंही प्रायव्हेट अकाउंट पाहू शकत होतं. मयूर कम्प्यूटर सायन्सचा विद्यार्थी असून तो महाराष्ट्रात राहणार आहे.
इन्स्टाग्रामवर प्रायव्हेट अकाउंट तेव्हाच पाहता येतं, ज्यावेळी दोन्ही अकाउंट्स एकमेकांना फॉलो करतात. परंतु इन्स्टाग्राममध्ये एका बगमुळे (Instagram Bug) कोणतंही प्रायव्हेट अकाउंट पाहता येत होतं. Instagram वरील Bug मुळे एखाद्या प्रायव्हेट अकाउंटला फॉलो न केल्यासही युजर्स अकाउंट पाहू शकत होते. या अकाउंट्सचे लाईक, कमेंट, सेव्ह काउंट्सही पाहिल्या जाऊ शकत होत्या. याबाबत मयूरने फेसबुकला माहिती दिली आणि फेसबुकनेही मान्य केलं, की इन्स्टाग्राममध्ये ही त्रुटी होती. याआधीही मयूरने सरकारच्या साईट्समध्ये त्रुटी निदर्शनास आणून दिल्या होत्या, परंतु सरकारकडून कोणतंही बक्षिस देण्यात आलं नव्हतं.
आता इन्स्टाग्रामने ही त्रुटी दुरुस्त केली आहे. मयूरला फेसबुककडून ईमेलद्वारे बक्षिसाबाबत सांगण्यात आलं आहे. फेसबुकने मयूरला पाठवलेल्या ईमेलमध्ये लिहिलं आहे, 'इन्स्टाग्राममधील समस्येचा आढावा घेतल्यानंतर आम्ही तुम्हाला 30000 डॉलर बाउंटी बक्षिस रुपात देत आहोत'.
जी समस्या मयूरने हायलाईट केली आणि फेसबुकला याबाबत रिपोर्ट केलं, त्यामुळे चुकीचा हेतू असणारे युजर्स इन्स्टाग्रामवर त्याचा फायदा घेऊ शकत होते. परंतु आता ही समस्या सोडवण्यात आली आहे, असं फेसबुककडून सांगण्यात आलं आहे.
मयूरने इन्स्टाग्रामच्या या त्रुटीबाबत फेसबुकला 16 एप्रिल रोजी सांगितलं होतं. त्यानंतर कंपनीने 15 जूनपर्यंत यावर काम केलं. जोपर्यंत समस्या सोडवली जात नाही, तोपर्यंत अशाप्रकारे त्रुटी सांगणाऱ्यांना ही बाब सिक्रेट ठेवण्याबाबत सांगितलं जातं, जेणेकरुन कोणी याचा चुकीचा फायदा घेऊ नये.
बग बाउंटी प्रोग्राम मोठ्या कंपन्यांकडून ठेवलं जातं. याअतंर्गत मोठ्या कंपन्यांच्या वेबसाईट किंवा दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर त्रुटी रिपोर्ट केल्यानंतर बक्षिस दिलं जातं. यात एखाद्या बग बदद्ल किंवा त्रुटीबदद्ल कंपनीला सांगावं लागतं आणि त्याचे डिटेल्स द्यावे लागतात. त्यानंतर कंपनी ठरवते की ती त्रुटी किती गंभीर आहे. एखाद्याने सांगितलेली त्रुटी किंवा बगची गंभीरता पाहून बक्षिसाची रक्कम ठरवली जाते.
भारतात यापूर्वीही फेसबुक आणि इतर कंपन्यांकडून लोकांना बक्षिस दिलं गेलं आहे. फेसबुकवर बग शोधून बक्षिस मिळवणाऱ्यांमध्ये भारतीय डेव्हलपर किंवा हॅकर्स सर्वात पुढे आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.