नवी दिल्ली, 24 ऑगस्ट : आजचं युग इंटरनेटचं आणि ऑनलाइन गोष्टींचं आहे. यामुळे जीवन जितकं सुखकर झालं आहे, तितकेच धोकेही वाढले आहेत. ऑनलाइन विश्वात फसवणूक होण्यासाठी एखादा बेसावध क्षण पुरतो. तेवढ्या त्या क्षणात संबंधित व्यक्तीचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं. म्हणूनच सर्वांनीच कायम सावध राहून ऑनलाइन जगात वावरताना सतत खबरदारी बाळगण्याची गरज आहे.
अलीकडे एसएमएसद्वारे (SMS) सायबर क्रिमिनल्स (Cyber Attackers) कोणाचीही फसवणूक करू शकतात. पर्सनल लोनपासून गिफ्ट व्हाउचर किंवा काही खास ऑफरपर्यंत अनेक बाबींबद्दलचे सेमेज अनेकांना येत असतात. कित्येक जण ते न वाचताच डिलीट करतात. काही जण मात्र त्यातल्या लिंकवर क्लिक करतात. अशा मेसेजमध्ये लिहिलेलं असतं, की सोबतच्या लिंकवर क्लिक करून ऑफरचा फायदा घ्यावा. त्या लिंकवर कोणी क्लिक केलं, की एखादा व्हायरस (Virus) किंवा अॅप (Malware App) डाउनलोड होतं. ते इन्स्टॉल झाल्यावर त्याद्वारे सायबर हल्लेखोरांना डेटा चोरणं सोपं होतं. बँकेशी निगडित माहिती चोरांच्या हाती लागली तर अकाउंट रिकामंही होऊ शकतं. त्यामुळे अशा अनोळखी लिंक्सवर अजिबात क्लिक करू नये. गुगलने अशा प्रकारच्या शेकडो बनावट अॅप्सवर बंदी (Cyber Fraud) घातली आहे.
कोणालाही ब्रँडेड गॅजेट्सची, कॅशबॅक, क्रेडिट कार्डची लालूच दाखवून किंवा खोट्या ऑफर्सना (Fake Offers) बळी पाडून त्यांच्याकडून त्यांची वैयक्तिक माहिती घेतली जाते. अशा प्रकारचे फिशिंग ई-मेल्स, मेसेजेस, कॉल्सला उत्तर न देणं गरजेचं आहे.
अनोळखी मेसेज, लिंकवर क्लिक करू नये. कोणत्याही व्यवहारादरम्यान आलेला ओटीपी इतर कोणालाही पाठवू नये. एटीएम कार्डचा पिन, कार्डचा नंबर किंवा सीव्हीव्ही नंबर कोणालाही देऊ नये. आपला पत्ता, जन्मतारीख किंवा कोणतीही वैयक्तिक शेअर करू नये.
काही वेळा कस्टमर केअर सेंटरमधून (Fake Customer Care Center) बोलत असल्याचं सांगूनही फसवणूक केली जाते. तसंच, कस्टमर केअर सेंटरचा नंबर म्हणून इंटरनेटवर काही सायबर गुन्हेगारांनी स्वतःचे नंबर्सही सेव्ह केलेले असतात. अडचणीच्या वेळी कोणीही पटकन गुगलवरून नंबर शोधायला गेलं आणि नेमका अशा व्यक्तींचा नंबर हाती लागला, तर आपोआपच ग्राहक सायबर गुन्हेगारांच्या तावडीत सापडतात. यापासून वाचण्यासाठी, कोणत्याही उत्पादनाच्या किंवा सेवेच्या कस्टमर केअर सेंटरचा नंबर तुम्ही ते उत्पादन किंवा सेवा जिथून घेताय, त्यांच्या कागदपत्रांवरूनच किंवा अधिकृत वेबसाइटवरूनच घेऊन लावावा. म्हणजे तो नंबर चुकण्याची शक्यता नाही. शिवाय कोणताही कस्टमर केअर अधिकारी ग्राहकाची वैयक्तिक माहिती मागत नाही. त्यामुळे अशी माहिती देऊ नये. त्यामुळे फोनवर कोणीही बँकिंग संबंधित किंवा इतर खासगी माहिती मागितल्यास, सावध व्हा.
अलीकडे फेसबुक किंवा अन्य वेगवेगळ्या सोशल नेटवर्किंग साइट्सवर (Fake Profile) बनावट प्रोफाइल्स बनवण्याचं प्रमाण वाढलं आहे. एखाद्याच्या नावाने प्रोफाइल बनवून त्याच्या मित्रांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली जाते. त्यानंतर मेसेज पाठवून इमर्जन्सीसाठी पैसे मागितले जातात. प्रोफाइलवरची माहिती, फोटो वगैरे आपल्या मित्राचाच असल्याने कोणाला शंका येत नाही, मात्र तिथेच फसवणूक होते. हे टाळण्यासाठी सोशल मीडियावर सावधानता बाळगायला हवी. फ्रेंड रिक्वेस्ट आल्या आल्या स्वीकारू नये. तो खरंच आपला मित्र आहे का हे तपासावं. म्युच्युअल फ्रेंड्स कोण आहेत ते पाहावं. पैसे मागितले जात असतील तर आपल्या मित्राला फोन करून प्रत्यक्ष विचारावं आणि खात्री करावी. शंका आली तर संबंधित अकाउंट ब्लॉक करावं आणि संबंधित सोशल मीडिया प्लॅटफॉर्मकडे तक्रार करावी.
केंद्र सरकारचे सायबर सल्लागार डॉ. निशिकांत ओझा यांनी सांगितलं, की फोनवर येणाऱ्या जाहिरातींच्या मेसेजमधील लिंक्सवर क्लिक करू नये. चुकून क्लिक केलं गेलं, तर फोन तातडीने बंद करावा. असं केल्यास कनेक्टिव्हिटी बंद होते. तरीही नुकसान होणारच नाही, याची खात्री मात्र देता येत नाही. फोन बंद करून सिमकार्ड काढून ते थोड्या वेळाने पुन्हा घालावं आणि नंतर फोन सुरू करून पाहावा. यामुळे नुकसानाची शक्यता कमी होते, असं ते म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cyber crime, Online fraud, SMS, Social media app, Tech news