नवी दिल्ली, 24 ऑगस्ट : कोरोना काळात ऑनलाईन फ्रॉडच्या (Online Fraud) संख्येत मोठी वाढ झाली आहे. हॅकर्स, सायबर क्रिमिनल्स विविध मार्गांनी सर्वसामान्य लोकांची फसवणूक करत आहेत. हॅकर्सने सॉफ्टवेअर इंजिनिअर्सलाही गंडा घातल्याची प्रकरणं समोर आली आहेत. असचं एक प्रकरण 12 ऑगस्ट 2021 रोजी समोर आलं असून भोपाळमध्ये राहणाऱ्या इंजिनियरला हॅकर्सनी 65000 रुपयांचा गंडा घातला आहे.
भोपाळमध्ये राहणारा अहमद लॉकडाउनमुळे घरातूनच काम करत होता. त्याचा पगारही वेळेत अकाउंटमध्ये येत होता. पण अनाचक आलेल्या मेसेजने त्याला मोठा धक्काच बसला. अहमदच्या स्मार्टफोनवर एक मेसेज आला, त्या मेसेजमध्ये एक लिंकही होती. एखादा प्रमोशनल मेसेज आल्यानंतर तो ओपन करुन पाहिला जातो, त्याचप्रमाणे अहमदने मेसेज ओपन केला, त्यानंतर त्यातील लिंकवरही क्लिक केलं. लिंकवर केल्यावर काही सेकंदातच काही मोबाईल अॅप्स फोनमध्ये डाउनलोड झाले. हे अॅप्स मोबाईल फोन हॅक (Hacking) करण्यासाठी होते.
अहमदला याबाबत काही समजलं नाही. पण काही वेळात त्याच्या फोनवर बँकेकडून एक मेसेज आला. मेसेजमध्ये, तुमच्या अकाउंटवर ओव्हरड्राफ्ट सेवा अॅक्टिव्ह केली असल्याचं सांगण्यात आलं. बँकेकडून असा मेसेज का आला याबाबत अहमदला काहीच समजलं नाही. त्यानंतर लगेचच फोनवर काही OTP आले.
ओटीपी कोणाशीही शेअर न करण्याचं त्याला माहित होतं. त्याने तसंच केलंही. तरीही त्याच्या अकाउंटमधून पैसे काढले जाऊ लागले. त्याच्या अकाउंटमध्ये तीन वेळा ट्रान्झेक्शन झालं आणि एकूण 65 हजारांची रक्कम काढण्यात आली.
इतकी मोठी रक्कम काढण्यात आल्यानंतर अहमदला त्याच्यासोबत फ्रॉड (Banking Fraud) झाल्याचं त्याच्या लक्षात आलं. अहमदने लगेच सायबर पोलिसात तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला.
कुठे झाली चूक?
अहमदला आलेल्या मेसेजमध्ये लिंक देण्यात आली होती. त्यावर क्लिक केल्यामुळेच ऑनलाईन फ्रॉड झाला. अहमदने या लिंकवर क्लिक केलं नसतं, तर हा फ्रॉड झाला नसता. त्यामुळेच कोणताही अनोळखी मेसेज आल्यास, त्यावर क्लिक न करण्याचा सल्ला सायबर एक्सपर्ट, विविध बँका आणि सरकारकडूनही दिला जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cyber crime, Online fraud, Tech news