नवी दिल्ली, 24 जानेवारी : तुमचा मोबाइल नंबर लकी ड्रॉमध्ये सामिल झाला आहे, तुम्हाला 25 लाखांची लॉटरी लागली आहे, असे मेसेज तुम्हालाही आले असतील तर सावध व्हा. सायबर क्रिमिनल्सकडून लॉटरीच्या नावाने फसवणूक केली जात आहे. मेसेजसह फोन कॉलवरही लोकांची फसवणूक होत आहे. वेळोवेळी सरकारीही अशा ऑनलाइन फ्रॉडबाबत अलर्ट करत आहे. परंतु तरीही सायबर क्रिमिनल्स विविध मार्गांनी लोकांची लूट करत आहेत.
कधी डेबिट कार्डच्या नावे, कधी क्रेडिट कार्ड, बँक केव्हायसी, कौन बनेगा करोडपतीच्या नावाने फेक कॉल येत आहेत. अशा कॉलपासून सावध राहण्याचा इशारा सरकारसह बँका, टेलिकॉम कंपन्यांकडूनही दिला जात आहे. रिझर्व्ह बँकही वेळोवेळी ग्राहकांना अलर्ट करते. रिझर्व्ह बँकेने यासाठी RBI Says नावाचं एक ट्विटर अकाउंटही बनवलं आहे. या ट्विटर अकाउंटद्वारे ग्राहकांना अलर्ट केलं जात आहे.
टॅक्स रिफंड, लॉटरी ऑफर मेसेज आल्यासही अलर्ट राहा. भारतीय रिझर्व्ह बँक अर्थात RBI ने सतर्क केलं आहे. RBI किंवा कोणत्याही संस्थेच्या नावाने न मागता मोठी रक्कम, लॉटरी आणि टॅक्स रिफंड ऑफर आल्यास त्यावर विश्वास ठेवू नका. कधीही तुमचा पीन नंबर, ओटीपी किंवा बँकेचे डिटेल्स कोणाशीही फोनवर, मेसेजवर शेअर करू नका.
खात्यातील व्यवहारांची माहिती समजण्यासाठी बँकेत मोबाइल नंबर आणि इमेल रजिस्टर्ड करा. त्याशिवाय काही फसवणूक झाल्यास बँकेकडे याबाबत माहिती द्या.

गृह मंत्रालयाच्या सायबर दोस्त या ट्विटर हँडल वरुनही सावधानेचा इशारा दिला आहे. जर तुम्ही लॉटरीमध्ये भाग घेतला नसेल, तर तुम्ही कधीही लॉटरी जिंकू शकत नाही. स्कॅमर्स ईमेल, एसएमएस पाठवून तुम्ही विजयी झाल्याचं सांगतात, त्या मेसेजला रिप्लाय करू नका.
केवळ कॉल, मेसेज, ईमेलच नाही तर सोशल मीडियाद्वारेही फसवणूक केली जाते. ई-कॉमर्स किंवा शॉपिंग वेबसाइटशी मिळती-जुळती फेक वेबसाइट बनवून व्यक्तीला सेल, ऑफरच्या नावाखाली फसवलं जातं.

फेक साइट लिंकवर क्लिक केल्यास, ई-कॉमर्स प्रमाणेच दिसणाऱ्या शॉपिंग वेबसाइटवर नेलं जातं. इथे खरेदीवर डिस्काउंट असल्याचं सांगत बँक डिटेल्स आणि डेबिट कार्ड डिटेल्स मागितले जातात आणि बँकेतून रक्कम काढली जाते. त्यामुळे अधिकृत साइटवरुनच शॉपिंग करा आणि कोणत्याही डिस्काउंट-ऑफरच्या जाळ्यात अडकू नका.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.