• Home
  • »
  • News
  • »
  • technology
  • »
  • सावधान! एका चुकीमुळे होऊ शकतो अँड्रॉईड फोनमधला संपूर्ण डेटा चोरी; कॉल रेकॉर्डचाही धोका

सावधान! एका चुकीमुळे होऊ शकतो अँड्रॉईड फोनमधला संपूर्ण डेटा चोरी; कॉल रेकॉर्डचाही धोका

मालवेअरमुळे स्मार्टफोन युजरला असं वाटतं, की फोनचा Android System Update आला आहे. प्रत्यक्षात मात्र ते असं भयानक अ‍ॅप असतं, की जे तुमच्या फोनमध्ये आपोआप इन्स्टॉल होऊन तुमच्या फोनच्या सगळ्या परमिशन्स आणि कंट्रोल दूर बसलेल्या हॅकरच्या हातात देतं.

  • Share this:
नवी दिल्ली, 5 एप्रिल : तंत्रज्ञान वेगाने विकसित होत असल्यामुळे अलीकडे जवळपास प्रत्येक गोष्ट आपल्याला एका टॅपवर हजर होते. मग त्या बँकिंग सेवा असोत की घरपोच फूड डिलिव्हरी. सगळ्या सुविधा स्मार्टफोनमध्ये उपलब्ध आहेत. या सुविधांसोबतच सध्या इंटरनेटवर अनेक मालवेअर (Malware) किंवा स्पायवेअरदेखील (Spyware) असतात. मालवेअर म्हणजे अशी  अ‍ॅप्स, जी तुम्हाला काही सेवा-सुविधा देण्याचा दावा करतात, मात्र तुमची खासगी माहिती, बँकिंग डिटेल्स, इत्यादी चोरून दुसरीकडे पाठवतात, हा त्यांचा एकमेव उद्देश असतो. गेल्या काही दिवसांत Fake System Update हे एक सर्वांत धोकादायक मालवेअर सगळीकडे फिरत आहे. या मालवेअरमुळे स्मार्टफोन युजरला असं वाटतं, की फोनच्या अँड्रॉईड सिस्टमचा अपडेट (Android System Update) आला आहे. प्रत्यक्षात मात्र ते असं भयानक  अ‍ॅप असतं, की जे तुमच्या फोनमध्ये आपोआप इन्स्टॉल होऊन तुमच्या फोनच्या सगळ्या परमिशन्स आणि कंट्रोल दूर बसलेल्या हॅकरच्या हातात देतं. तुम्ही तुमच्या फोनच्या माध्यमातून जे काही करत असाल, चॅटिंग, फोनच्या गॅलरीमधले फोटो-व्हिडीओ किंवा तुमच्या फोनमधली बँकिंग अ‍ॅप्स या सगळ्या गोष्टी हॅकर दूर बसून ट्रॅक करू शकतो. तसंच, हे मालवेअर तुमच्या फोनमध्ये आपोआप ऑडिओ किंवा व्हिडीओ रेकॉर्डिंगही करू शकतं. Zimperium zLabs च्या सिक्युरिटी रिसर्चने सगळ्यात पहिल्यांदा हे मालवेअर शोधून काढलं. त्यांच्या म्हणण्यानुसार हे  अ‍ॅप तुमच्या फोनमध्ये असणं हेच खूप धोकादायक आहे. कारण FakeSysUpdate तुमच्या फोनमध्ये इन्स्टॉल झाल्यानंतर ते बॅकग्राउंडला कायम सुरू राहतं आणि त्याचा तुम्हाला पत्ताही लागत नाही. (वाचा - डेटा यूजबाबत Airtel ने पाठवलं 12 लाखांचं बिल; SMS पाहून ग्राहकाला हार्ट अटॅक) कधी तरी तुम्हाला स्क्रीनवर 'Searching for Updates .... ' असा मेसेज दिसतो. हा मेसेज पाहिल्यावर कोणत्याही युजरला असंच वाटेल, की फोनच्या अँड्रॉईड सिस्टमचा अपडेट आला आहे. त्यामुळे तुम्ही अगदी सहजपणे ते इन्स्टॉल कराल. ते तुम्ही केलंत, की तुमच्या फोनच्या SMS इनबॉक्सपासून तुमचा सगळा खासगी डेटा हॅकर्सच्या हातात गेलेला असेल.

(वाचा - सततच्या कॉल्समुळे कंटाळलात? जाणून घ्या फोन कट न करताच Avoid करण्याची सोपी पद्धत)

FakeSysUpdate हे स्पायवेअर इंटरनेटवर कसं पसरलं, याचा शोध अद्याप 'सायबर सिक्युरिटी रिसर्च'ला लागलेला नाही. Zimperium आणि Malwarebytes Labs या सायबर सिक्युरिटी फर्म्सचा असा दावा आहे, की हे मालवेअर गुगल प्ले स्टोअरमधून पसरलेलं नाही. हे मालवेअर spear phishing चा वापर युजरचा डेटा सिक्युरिटी ब्रीच करण्यासाठी अर्थात भेदण्यासाठी करत असल्याचं सायबर विशेषज्ञांचं म्हणणं आहे.
Published by:Karishma
First published: