नवी दिल्ली, 8 एप्रिल: फेसबुक डेटा लीक (Facebook Data Leak) प्रकरणानंतर व्हॉट्सअॅप स्कॅमचंही (WhatsApp Scam) एक नवं प्रकरण समोर आलं आहे. या नव्या स्कॅममध्ये हॅकर्स युजर्सच्या WhatsApp OTP चा वापर करुन अकाउंट हॅक करतात. मागील वर्षी नोव्हेंबरमध्येही अशाच प्रकारचं प्रकरण समोर आलं होतं. आता पुन्हा एकदा हा स्कॅम समोर आला आहे. हॅकर्स युजर्सचं अकाउंट हॅक करुन सर्व अॅक्सेस ब्लॉक करतात. WhatsApp चा हा स्कॅम ट्रॅक करणं सोपं नाही, कारण तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधून कोणाचातरी वापर करुन तुमचा व्हॉट्सअॅप ओटीपी हॅक केला जातो.
या नव्या WhatsApp Scam मध्ये युजरला एक टेक्स्ट मेसेज रिसिव्ह होतो, ज्यात OTP दिलेला असतो. हॅकर्स युजर्सच्या फ्रेंड लिस्टचा वापर करुन OTP शेअर करण्यासाठी सांगतात. युजरने आपल्या मित्राला OTP शेअर केल्यानंतर, हॅकर्स त्या कोडचा वापर करुन, युजरच्या स्मार्टफोनवरुन WhatsApp लॉगआउट करतात आणि आपल्या डिव्हाईसमध्ये लॉक-इन करतात.
WhatsApp हॅक करण्यासाठी हॅकर्स युजरला एखाद्या Unknown नंबरवरुन किंवा एखाद्या मित्राच्या नंबरवरुन व्हॉट्सअॅपवर एक मेसेज पाठवतात. त्यानंतर हॅकर्स युजरला काही इमर्जेंसी असल्याचं सांगतात आणि तुमच्या मित्राचं WhatsApp अकाउंट लॉक झाल्याचा बनाव करतात. त्याच्या मोबाईलवर ओटीपी येत नाही, त्यामुळे तुमच्या नंबर एक ओटीपी येईल, तो शेअर करा असं सांगितलं जातं. तुम्हालाही तुमचा मित्र किंवा नातेवाईक अडचणीत असल्याचं वाटतं आणि ओटीपी शेअर केला जातो.
या स्कॅमपासून कसं वाचाल?
WhatsApp च्या या नव्या स्कॅमपासून वाचण्यासाठी काही बेसिक गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं ठरतं. सर्वात आधी युजरने आपल्या त्या मित्राला कॉल करावा, ज्याने OTP साठी टेक्स्ट मेसेज पाठवला आहे आणि त्याच्याकडून खात्री करुन घ्या की ओटीपी त्याने पाठवला आहे की त्याच्या अकाउंटचा वापर करुन दुसऱ्याने पाठवला आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे कधीही कोणाशीही तुमचा OTP शेअर करू नका.
- Whatsapp कधीही विना मागितल्याशिवाय OTP पाठवत नाही. जोपर्यंत युजर OTP साठी रिक्वेस्ट करणार नाही, तोपर्यत ओटीपी येत नाही.
- रिक्वेस्ट केल्याशिवाय OTP आल्यास, त्याकडे दुर्लक्ष करा आणि कोणासोबतही शेअर करू नका.
- एखाद्या मित्राने, नातेवाईकाने टेक्स्ट मेसेज करुन ओटीपी मागितल्यास, त्याला कॉल करुन याबाबत माहिती घ्या.
WhatsApp हॅक झाल्यास काय कराल?
जर WhatsApp हॅक झालं आणि हॅकरला व्हॉट्सअॅप अकाउंटचा अॅक्सेस मिळाला तर, तुमचं व्हॉट्सअॅप लगेच रिसेट करा. व्हॉट्सअॅपवर पुन्हा तसंच लॉग-इन करावं लागेल, जसं पहिल्यांदा अकाउंट बनवण्यासाठी लॉग-इन केलं होतं. त्यानंतर पुन्हा OTP येईल आणि युजर पुन्हा आपल्या डिव्हाईसवर आपल्या व्हॉट्सअॅपचा एक्सेस मिळवू शकतील. हॅकरच्या डिव्हाईसवरुन तुमचं व्हॉट्सअॅप अकाउंट लॉग-आउट होईल.
या वर्षी फेब्रुवारीमध्ये आलेल्या एका रिपोर्टनुसार, iPhone युजर्सकडून बनावट WhatsApp वर्जन टिक करुन घेऊन हॅकर्स खासगी माहिती चोरी करत होते. या बनावट व्हॉट्सअॅप वर्जनसह हॅकर्स इटालियन सर्विलांस फर्म Cy4Gate चं नाव समोर आलं होतं. सायबर सिक्योरिटी फर्म Citizen Lab ने या बनावट WhatsApp वर्जनद्वारे होणाऱ्या हॅकिंगची माहिती मिळवली होती. सिक्योरिटी फर्मच्या दाव्यानुसार, हॅकर्स युजरला डिव्हाईसमध्ये MDM (Mobile Device Management) फाईम इन्स्टॉल करुन टार्गेट करत होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Otp, Scam, Tech news, Technology, User data, Whatsapp, WhatsApp chats