मुंबई : क्रॉस बॉर्डर लव्ह स्टोरी म्हटलं की शारूखचा वीर-झारा चित्रपट सगळ्यात पहिले डोळ्यांसमोर येतो. पण रिअल लाईफ स्टोरी म्हटलं की हमखास भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा आणि माजी पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक डोळ्यांसमोर येतात. या दोघांच्या प्रेमप्रकरणाच्या बातमीने भारत आणि पाकिस्तान अशा दोन्ही देशांत वादळ आणलं होतं.
तेव्हा अनेक वाद आणि टीकांना तोंड देत सानिया आणि शोएब यांनी आपलं नातं पूर्णत्वास नेलं होतं. तेव्हापासून अनेकांसाठी आयडियल झालेली ही जोडी विभक्त होणार अशा चर्चा सुरु आहेत.सानियाच्या काही रिसेन्ट सोशल मीडिया पोस्टमधून या शंकांना अजूनच हवा मिळतिये. म्हणूनच सानिया आणि शोएब यांची लव्हस्टोरी कशी सुरु झाली होती? आणि त्यांचं वेगळं होण्याचं कारण काय सांगितलं जातंय? बघूया..
२००३ मध्ये सानिया आणि शोएब पहिल्यांदा भेटले होते. पण तेव्हा सानियाने शोएबला काहीच भाव दिला नव्हता, असं स्वतः शोएबने एका पाकिस्तानी शोमध्ये सांगितलं होतं. त्यानंतर दोघं पुन्हा भेटले ते २००९ मध्ये. ऑस्ट्रेलियातील होबार्टमध्ये त्यांची भेट झाली. तो काळ म्हणजे सानियाच्या आयुष्यातील खूप अवघड काळ होता, असं सानियाने तिच्या ऑटोबायोग्राफीमध्ये सांगितलेलं आहे. या काळात सानिया आणि शोएब यांचं चांगलं बोलणं सुरु झालं आणि हळूहळू त्याचं रूपांतर प्रेमात झालं.
पाच महिने डेट केल्यानंतर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नबंधनात अडकण्यापूर्वी त्यांच्या आधीच्या पार्टनरशी संबंध तोडले होते. शोएब त्याची पूर्वीश्रमीची पत्नी आयेशा सिद्दीकीपासून विभक्त झाला होता. तर, सानियाने सोहराब मिर्झासोबत साखरपुडा केल्यानंतर लग्न मोडलं होतं.
१२ एप्रिल २०१० रोजी हैदराबादमध्ये अगदीच ग्रँड पद्धतीने त्यांचं लग्न पार पडलं. सानियाने लग्नात तिच्या आईची लाल रंगाची साडी नेसली होती आणि शोएबने काळ्या रंगाची शेरवानी घातली होती. लग्नानंतर त्यांचं रिसेप्शन सियालकोट झालं. लग्नाच्या ८ वर्षानंतर म्हणजेच २०१८ मध्ये या जोडप्याला एक मुलगा झाला ज्याचं नाव त्यांनी इझहान मिर्झा मलिक असं ठेवलं.
सानिया आणि शोएबच्या लग्नापासून त्यांच्या नात्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांना असते. त्यांच्या सोशल मीडियावरून सगळं सुफळ मंगल असल्याचं आजवर दिसत आलंय. मात्र आता सानियाच्या सोशल मीडिया पोस्टमधून या दोघांत काहीतरी बिनसलं असल्याच्या चर्चा सुरु आहेत.
पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्सनुसार, शोएब मलिकने आपल्या एका टीव्ही शोदरम्यान सानियाला चिट केलं होतं, तिची फसणूक केली होती आणि तेव्हापासून हे दोघे वेगळे राहत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Cricket news, Love at first sight, Love story, Pakistan Cricket Board, Pakistan love, Sania mirza, World cricket