मुंबई, 12 नोव्हेंबर: रोहित शर्माच्या टीम इंडियाला टी20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं. इंग्लंडनं तब्बल 10 विकेट्सनी भारताचा पराभव केला. या लाजीरवाण्या पराभवानंतर भारतीय खेळाडूंवर टीकेची झोड उठली. आजी माजी खेळाडूंसह अनेकांनी यावर भाष्य केलं. पण आता याच पराभवावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं एक मोठं विधान केलं आहे.
168 ही चांगली धावसंख्या नाही...
एएनआयनं नुकत्याच पोस्ट केलेल्या एका व्हिडीओमध्ये सचिन तेंडुलकरनं म्हटलंय की भारताचा पराभव खूपच निराशाजनक आहे. आपण सगळेच टीम इंडियाचे चाहते आहोत पण आपल्याला ही हार स्वीकार करावी लागेल. टीम इंडियानं केलेल्या 168 धावा ही चांगली धावसंख्या नव्हती. अॅडलेड असं ग्राऊंड नाही की जिथे इतक्या कमी धावसंख्येची अपेक्षा तुम्ही कराल. इथे 168 धावा म्हणजे दुसऱ्या एखाद्या ग्राऊंडवर त्या 150 धावाच आहेत. कारण अॅडलेडमध्ये साईड बाऊंड्रीज खूप लहान आहेत. त्यामुळे इथे भारतानं किमान 190 धावा करायला हव्या होत्या.
हेही वाचा - Pak vs Eng: बाबर की बटलर, कोण होणार 13 कोटींचा मालक? जाणून घ्या काय आहे प्रकरण...
टीम इंडियाची खराब गोलंदाजी
सचिननं पुढे म्हटलंय की भारतीय गोलंदाजीबाबत बोलायचं झाल्यास आपण विकेट घेण्यात अपयशी ठरलो. आपल्यासाठी हा खूप कठीण सामना ठरला. एकही विकेट न घेता 170 धावा. हे खूपच निराशाजनक आहे. पण तरीही आपल्याला टीम इंडियाच्या कामगिरीला या एका परफॉर्मन्समुळे कमी लेखून चालणार नाही. कारण आपण जगातली नंबर वन टीम आहोत. आणि हे स्थान आपण एका रात्रीत मिळवलेलं नाही.
#WATCH | I know that the Semi Finals against England was very disappointing. Let's accept that we did not put up a good total on the board. It was a tough game for us, a bad and disappointing defeat. We have been World number 1 T-20 side as well: Cricketer Sachin Tendulkar to ANI pic.twitter.com/zjT3SjwZ8l
— ANI (@ANI) November 12, 2022
प्रत्येक खेळाडू जिंकण्यासाठीच...
शेवटी सचिन असं म्हणाला की, 'तुम्हाला इथपर्यंत पोहोचण्यासाठी चांगलं क्रिकेट खेळावं लागतं. आणि आपल्या टीमनं याआधी ते केलंय. म्हणूनच अशा प्रकारच्या कामगिरीला ठीक आहे... असं म्हटलं जाऊ शकतं. प्रत्येक खेळाडू मैदानात असाच उतरत नाही. प्रत्येक खेळाडू देशाला जिंकून देण्यासाठीच मैदानात उतरतो. पण प्रत्येक दिवशी तसं होऊ शकत नाही.क्रिकेटमध्ये उतार चढाव येत राहतात. म्हणूनच आपण असं नाही म्हणू शकत की आपण जिंकलो आणि ते हरले.'
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sachin tendulkar, Sports, T20 world cup 2022