दिल्ली, 01 डिसेंबर: भारतीय संघ डिसेंबरमध्ये बांगलादेशविरुद्ध एकदिवसीय आणि कसोटी मालिकेनंतर नव्या वर्षात जानेवारीत तीन टी20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. श्रीलंकेचा संघ तेव्हा भारत दौऱ्यावर येणार आहे. या मालिकेसाठी अद्याप भारतीय संघाची निवड झालेली नाही. मात्र बीसीसीआयमधील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार श्रीलंकेविरुद्ध या मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या संघात रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल हे नसतील.
श्रीलंका दौऱ्यात या तिन्ही खेळाडुंना विश्रांती दिली जाईल. भारतीय संघाचा उपकर्णधार केएल राहुल या मालिकेत खेळणार नाही. त्याने लग्नासाठी सुट्टी घेतली असल्याचं सांगण्यात येत आहे. अद्याप बीसीसीआयकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. याशिवाय दिनेश कार्तिक, मोहम्मद शमी हे खेळाडुसुद्धा या मालिकेत नसतील.
हेही वाचा: इंग्लंडची कसोटीत टी20 सारखी फटकेबाजी, पाकिस्तानच्या गोलंदाजांची केली धुलाई
बीसीसीआय़च्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्याने इनसाइड स्पोर्टने ही माहिती दिली की, डिसेंबरमध्ये नव्या निवड समितीची स्थापना होणार आहे. त्याच समितीकडून श्रीलंका दौऱ्यासाठी टी20 मालिकेसाठी संघाची निवड होईल. मात्र या मालिकेत अनुभवी खेळाडुंशिवाय भारतीय संघ उतरेल हे नक्की आहे. रोहित, विराटला याबाबत आधीच कल्पना देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत कर्णधारपदाची धुरा कोणाकडे सोपवली जाणार असा प्रश्न आहे. पुन्हा हार्दिक पांड्याकडेच नेतृत्व दिलं जाईल. बीसीसीआयच्या सूत्रांनी इनसाइड स्पोर्टला सांगितले की, श्रीलंकेविरुद्ध मालिकेत हार्दिक पांड्याकडे नेतृत्वाची धुरा दिली जाईल.
रोहित, विराट श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या मालिकेचा भाग नसतील. 2024 मध्ये होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाच्या तयारीचा हा एक भाग असल्याचं म्हटलं जातंय. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये भारताला सेमीफायनलमध्ये पराभूत व्हावं लागल्याने पुन्हा एकदा नाराजीचा सामना करावा लागला होता. यानंतर भारताच्या टी20 संघात बदलाची मागणी केली जात होती. भारतीय संघात बदलाची वेळ आली असून तरुण कर्णधाराच्या नेतृत्वाखाली संघ तयार करायला हवा असं क्रिकेट तज्ज्ञांनी म्हटलंय.
हेही वाचा : केएल राहुलने लग्नासाठी BCCIकडे मागितली सुट्टी, आथियासोबत लवकरच लग्नाच्या बेडीत
बीसीसीआयसुद्धा आता संघात बदलासाठी तयार झाली असून हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली आगामी टी20 वर्ल्ड कपसाठी नव्या संघाच्या बांधणीसाठी हालचाली सुरू आहेत. आता श्रीलंका दौऱ्यासाठी दिग्गजांना विश्रांती देण्याचा विचार हा त्याचाच भाग असल्याची चर्चा आहे. रोहित टी20 संघाचा कर्णधार जरी राहिला नाही तर आगामी एकदिवसीय वर्ल्डकपसाठी तोच भारतीय संघाचा कर्णधार असेल. कसोटीतसुद्धा त्याच्यावर नेतृत्वाची जबाबदारी असेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Hardik pandya, Rohit sharma, Shikhar dhawan, Team india, Virat kohli