रावळपिंडी, 01 डिसेंबर: पाकिस्तान दौऱ्यावर असलेल्या इंग्लंडच्या फलंदाजांनी पहिल्या कसोटीत जबरदस्त अशी सुरुवात केली आहे. कसोटी सामन्यात त्यांनी पहिल्याच दिवशी टी20 सारखी तुफान फटकेबाजी केली. गुरुवारी लंच ब्रेकपर्यंत इंग्लंडने 27 षटकात बिनबाद 174४ धावा केल्या. त्यांनी 6.44 च्या धावगतीने धावा केल्या आहेत. यात जॅक क्रॉलेने 79 चेंडूत 91 धावा केल्या. या खेळीत जॅकने 17 चौकार लगावले आहेत. तर बेन डकेटने 85 चेंडूत 77 धावांची खेळी केली. या खेळीत डकेटने 11 चौकार लगावले आहे. पाकिस्तानचे सगळेच गोलंदाज महागडे ठरले.
बेन स्टोक्सला काही दिवसांपूर्वीच कसोटी संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली. तेव्हापासून संघाचा खेळ आक्रमक झाला आहे. इंग्लंडचे सध्याचे प्रशिक्षक आणि न्यूझीलंडचे माजी कर्णधार ब्रेडन मॅक्युलम हे स्वत: आक्रमक फलंदाज आहेत. त्याचाही परिणाम संघावर दिसून येत आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने पहिल्याच सत्रात 5 गोलंदाज वापरले पण एकाही गोलंदाजाला इंग्लंडची सलामची जोडी फोडता आली नाही. फिरकीपटू जाहिद अहमद कसोटीत पदार्पण करत असून त्याने 5 षटकात 40 धावा दिल्या.
हेही वाचा : केएल राहुलने लग्नासाठी BCCIकडे मागितली सुट्टी, आथियासोबत लवकरच लग्नाच्या बेडीत
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शाह कसोटी क्रिकेटमध्ये हॅटट्रीक घेणारा सर्वात तरुण गोलंदाज आहे. मात्र रावळपिंडीत सुरू असलेल्या कसोटी सामन्यात आतापर्यंत तो फारशी चमकदार कामगिरी करू शकला नाही. 7 षटकात त्याने 38 धावा दिल्या. टी20 वर्ल्ड कपमध्येही त्याची कामगिरी चांगली होती. तर वेगवान गोलंदाज हारिस रऊफने 7 षटकात 42 धावा दिल्या आहेत. त्याशिवाय मोहम्मद अलीने 6 षटकात 37 तर आगा सलमानने 2 षटकात 14 धावा दिल्या आहेत.
हेही वाचा : पाकिस्तानमध्ये इंग्लंडच्या संघावर व्हायरसचा हल्ला, कसोटीआधी अर्धा संघ आजारी
पहिल्या कसोटीत पाकिस्तानकडून 4 खेळाडू पदार्पण करत आहेत. यामध्ये सौद शकील, हारिस रऊफ, मोहम्मद अली, जाहिद महमूद यांचा समावेश आहे. तर वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी टी20 वर्ल्ड कपमध्ये जखमी झाला होता. त्यामुळे तो या मालिकेत नाही. दुसरीकडे बाबर आजमने म्हटलं होतं की, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पाहता ही कसोटी मालिका आम्हाला जिंकायची आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.