नवी दिल्ली, 15 डिसेंबर : प्रत्येकाला वेगवेगळ्या गोष्टींची आवड असते. काहींना चित्रपट पाहण्याची आवड असते, तर काहींना टीव्हीवरच्या सीरियल्स पाहण्याची सवय असते. बऱ्याचदा या सवयी व्यसन बनतात. वेगवेगळ्या प्रकारच्या खेळांची आवड असलेले अनेक जण पाहायला मिळतात. काही जण एखादा इव्हेंट असेल तर तो पाहण्यासाठी अनेक रात्री जागतात. अशाच एका व्यक्तीने मॅच पाहण्यासाठी आपल्या तब्येतीकडे दुर्लक्ष केलं. त्याचा परिणाम असा झाला, की आता त्याला नीट बोलताही येत नाही आणि खाता-पिताही येत नाही. त्याने मागच्या अनेक रात्री जागून फुटबॉल वर्ल्ड कपच्या मॅचेस पाहिल्या. तमाम फुटबॉल चाहत्यांसाठी हा काळ खूप रोमांचक असला तरी या तरुणाला ही आवड महागात पडली आहे. त्याच्या चेहऱ्याला पॅरालिसिस अर्थात लकवा झाला आहे. फुटबॉल पाहणं इतकं महागात पडेल, असा विचारही कधी त्याने केला नसेल. चीनच्या वुहानमध्ये राहणारा 26 वर्षीय मिस्टर काओ याने वर्ल्ड कप पाहण्यासाठी एक-दोन नव्हे तर सात रात्री जागवल्या आणि तो अशा संकटात सापडला, ज्याचा त्याने विचारही केला नव्हता. सलग 7 दिवस तो ऑफिसमधून संध्याकाळी 6 वाजता घरी यायचा आणि मॅच बघायला बसायचा. सकाळी सहा वाजेपर्यंत तो मॅच पाहायचा आणि काही तासांनी तो तयार होऊन ऑफिसला जायचा. झोप न मिळाल्याने त्याला थकवा जाणवू लागला. 30 नोव्हेंबरला उठल्यानंतर त्याला खूप थकवा जाणवला. ऑफिसमध्ये थोडा ब्रेक घेऊन तो कामाचा विचार करत होता; पण त्याच्या शरीराची हालचाल होत नव्हती. हे वाचा - शूटिंगवेळी माजी क्रिकेटपटूच्या कारचा अपघात, एअरलिफ्टने रुग्णालयात केलं दाखल एका क्षणी, काओला असं वाटलं की त्याचे ओठ एका बाजूला वळू लागले आहेत आणि त्याला त्याच्या पापण्यादेखील मिटता येत नाहीत. लक्षणं हळूहळू वाढू लागल्यावर त्याने हॉस्पिटलमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. तिथे डॉक्टरांनी त्याला पॅरालिसिसचा झटका आल्याने त्याचा चेहरा असा झाला असल्याचं सांगितलं. सतत जागं राहणं आणि थंडीमुळे त्याला चेहऱ्यावर पॅरालिसिसचा झटका आल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या मते तो लवकरच बरा होईल. हे वाचा - VIDEO : मेस्सीची जादू अन् अल्वारेजची कमाल; अर्जेंटिनासाठीचा तिसरा गोल एकदा बघाच कोणत्याही गोष्टीची आवड असणं आणि त्यासाठी वेळ देणं यात चुकीचं काहीच नसलं तरी अतिरेक केल्यामुळे आरोग्यावर किती गंभीर परिणाम होऊ शकतो, हे या तरुणाच्या बाबतीत घडलेल्या प्रकारावरून दिसून आलंय. तब्बल सात रात्री त्याने फुटबॉल पाहण्यासाठी जागरण केलं. दिवसा ऑफिसला जाणं आणि रात्री जागून मॅच बघणं, यामुळे त्याच्या शरीराला गरजेपुरती झोप मिळाली नाही. परिणामी त्याला पॅरालिसिसचा झटका आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.