मुंबई, 14 डिसेंबर : इंग्लंडचा माजी कर्णधार अँड्र्यू फ्लिंटॉफचा एका शूटिंगवेळी अपघात झाला आहे. बीसीसी सिरिजच्या एका एपिसोडचं शूटिंग सुरू असताना कारचा भीषण अपघात झाला. यानंतर फ्लिंटॉफला एअरलिफ्ट करून रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातात फ्लिंटॉफला गंभीर दुखापत झाली नसल्याची माहिती समजते. अँड्र्यू फ्लिंटॉफच्या अपघाताबाबत बीसीसीने एका निवेदनात म्हटलं की, फ्रेडीचा आज टॉप गिअर टेस्ट ट्रॅकवर एक अपघात झाला. क्रूमधील वैद्यकीय पथक घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. त्यानंतर उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या प्रकृतीबाबत सविस्तर माहिती आम्ही देऊ असंही सांगण्यात आलं. हेही वाचा : VIDEO : मेस्सीची जादू अन् अल्वारेजची कमाल; अर्जेंटिनासाठी केलेला तिसरा गोल एकदा बघाच 2019 मध्ये अँड्र्यू फ्लिंटॉफ एका शोचा को-प्रेझेंटर बनला होता. तेव्हासुद्धा त्याचा अपघात झाला होता. फ्लिंटॉफचा को होस्ट ख्रिस हॅरीस आणि पॅडी मॅकगुइनेस यांच्याशी रेसवेळी अपघात झाला होता. मोटराइज्ड ट्राइक टाइम बँडिट 124 मैल प्रती तास वेगाने चालवताना त्याचे नियंत्रण सुटले होते. हेही वाचा : FIFA 2022 : मेस्सीने रचला इतिहास, दिग्गज पेलेंच्या विक्रमावर नजर अँड्र्यू फ्लिंटॉफने इंग्लंडसाठी 1998 ते 2009 दरम्यान 79 कसोटी, 141 एकदिवसीय आणि 7 टी20 सामने खेळले आहेत. त्याने इंग्लंडच्या संघाचं नेतृत्वही केलं होतं. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने 3845 धावा केल्या तर 226 विकेट घेतल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 3394 धावा आणि 169 विकेट आहेत. तर टी20 मध्ये 76 धावा आणि 5 विकेट आहेत. २००५ मध्ये एशेस मालिकेत त्याला प्लेअर ऑफ द सिरीज पुरस्कार मिळाला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.