मुंबई, 30 सप्टेंबर: जसप्रीत बुमराच्या दुखापतीनंतर भारतीय गोटात सध्या चिंतेचं वातावरण आहे. बुमरा खेळणार की नाही यावर अजूनही बीसीसीआयनं शिक्कामोर्तब केलेलं नाही. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीनं तर बुमराबाबत वेट अँड वॉच अशा प्रकारचं विधान करत अनेकांना संभ्रमात टाकलं आहे. याच दरम्यानं आणखी एक नवी माहिती समोर आली आहे. बुमराच्या दुखापतीच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघात दोन खेळाडूंना स्टँड बाय म्हणून घेणार असल्याची ही माहिती आहे. त्यानुसार हे दोघेही खेळाडू पुढच्या आठवड्यात ऑस्ट्रेलियाला निघणार आहेत. स्पीड स्टार उमरान मलिकला संधी? मिळालेल्या माहितीनुसार यंदाचं आयपीएल गाजवणारा सनरायझर्स हैदराबादचा स्पीड स्टार उमरान मलिकला टीम इंडियाच्या स्टँड बाय खेळाडूंमध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे. उमरान मलिकनं आयपीएलच्या 15 व्या मोसमात आपल्या वेगानं सर्वांचच लक्ष वेधून घेतलं होतं. उमरान मलिक 150 च्या स्पीडनं बॉलिंग टाकू शकतो. त्यामुळे ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्यांवर त्याचा फायदा भारतीय संघाला होऊ शकतो. उमरान मलिकनं जून महिन्यात आयर्लंड दौऱ्यात टीम इंडियाकडून टी पदार्पण केलं होतं. त्यानं आतापर्यंत तीन टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. आयपीएलमध्ये त्यानं आतापर्यंत 17 सामन्यात 24 विकेट्स घेतल्या आहेत.
हेही वाचा - T20 World Cup: बुमरा टी20 वर्ल्ड कप खेळणार? पाहा बुमराबाबत हे काय म्हणाला गांगुली… सिराजही स्टँड बायमध्ये? दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत जसप्रीत बुमरा संघाबाहेर गेल्यानं उर्वरित दोन सामन्यांसाठी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला पाचारण करण्यात आलं आहे. गुवाहाटी आणि इंदूरच्या टी20साठी सिराज टीम इंडियात दाखल होईल. पण त्याचबरोबर वर्ल्ड कपसाठीही सिराजला संधी मिळण्याची शक्यता आहे. उमरान मलिकसह सिराजही टी20 वर्ल्ड कपसाठी स्टँड बाय खेळाडू म्हणून ऑस्ट्रेलियाला जाणार असल्याची माहिती आहे. भारतीय संघ 6 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाकडे प्रयाण करेल. तर 17 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला सराव सामना खेळणार आहे. हेही वाचा - Womens Asia Cup: उद्यापासून वुमन्स एशिया कपचा थरार, काय आहे हरमनप्रीतचा खास प्लॅन? वर्ल्ड कपसाठी कुणाला संधी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेनंतर भारतीय संघ 6 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. त्याआधी 15 सदस्यीस संघात बुमराची वर्णी लागली नाही तर कुणाला संधी मिळणार हा प्रश्न आहे. दरम्यान स्टँड बाय खेळाडू म्हणून निवड झालेले मोहम्मद शमी, दीपक चहर, रवी बिश्नोई आणि श्रेयस अय्यर हेदेखील भारतीय संघासोबत ऑस्ट्रेलियाला जाणार आहेत. आणि आता त्यात सिराज आणि उमरान मलिकची भर पडणार आहे. पण जर बुमरा दुखापतीमुळे संघाबाहेर गेला तर सिराज, दीपक चहर आणि शमी या तिघांपैकी कुणा एकाची 15 सदस्यीय संघात निवड होऊ शकते.

)







