मुंबई, 11 नोव्हेंबर: यंदाच्या टी20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान सेमी फायनल रंगणार अशी आशा बाळगून असलेल्या करोडो क्रिकेट चाहत्यांचा गुरुवारी भ्रमनिरास झाला. 15 वर्षांनी दुसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कप जिंकण्याची चालून आलेली संधी टीम इंडियानं गमावली. अॅडलेडच्या मैदानात इंग्लंडनं भारतीय खेळाडूंच्या आणि चाहत्यांच्या स्वप्नांना फार मोठा सुरुंग लावला आणि फायनलमध्ये दणक्यात धडक मारली. पण टीम इंडिया सेमी फानयलमध्ये हरली असली तरी आयसीसीकडून भारतीय संघाला घसघशीत रक्कम बक्षिस स्वरुपात मिळाली आहे. त्यामुळे सेमी फायनलमध्ये हरले असले तरी भारतीय खेळाडू मालामाल झाले आहेत. टीम इंडियाला किती मिळालं बक्षिस? यंदाच्या टी20 वर्ल्ड कपआधी आयसीसीनं देण्यात येणाऱ्या बक्षिस रकमेची घोषणा केली होती. यंदा वर्ल्ड कपमध्ये आयसीसी बक्षिसापोटी तब्बल 45.67 कोटी रुपये खर्च करणार आहे. सेमी फायनल हरणाऱ्या संघालाही आयसीसीकडून घसघशीत रक्कम दिली जाते. त्यानुसार भारतीय संघाला हरल्यानंतरही जवळपास 3 कोटी 27 लाख रुपये बक्षिस म्हणून मिळणार आहेत. त्यामुळे हरल्यानंतरही भारतीय खेळाडू ऑस्ट्रेलियातून येताना मालामाल होऊन येणार आहेत. दरम्यान पाकिस्तानविरुद्ध सेमी फायनल हरलेल्या न्यूझीलंडला देखील इतकीच रक्कम मिळणार आहे. हेही वाचा - Eng vs Pak: फायनलमध्ये पाकिस्तान हरणार! इंग्लंडसाठी ठरली ‘ही’ गुड न्यूज… पाहा काय आहे प्रकरण विजेत्यांना किती रक्कम मिळणार? आयसीसीकडून विजेत्या संघाला जवळपास 13 कोटी रुपये मिळणार आहेत. तर उपविजेत्या टीमला साडेसहा कोटी रुपये मिळतील. मेलबर्नच्या मैदानात पाकिस्तान आणि इंग्लंड हे दोन संघ फायनलमध्ये एकमेकांविरुद्ध लढणार आहेत. त्यामुळे विजेतेपदासाठीचं 13 कोटींचं बक्षिस कोणता संघ मिळवणार याचा फैसला येत्या रविवारी होणार आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. हेही वाचा - Team India: लाजीरवाण्या पराभवानंतर ‘पहिली विकेट’, टीम इंडियाच्या ‘या’ सदस्याचा करार संपुष्टात सुरुवात दणक्यात पण ऐनवेळी निराशा भारतानं यंदाच्या वर्ल्ड कपची दणक्यात सुरुवात केली होती. पाकिस्तानविरुद्ध मेलबर्नमधली सलामीची लढत जिंकून भारतीय संघ सरस ठरला. त्यानंतर पाचपैकी 4 सामने जिंकून टीम इंडियान गटात अव्वल स्थान पटकावलं. पण सेमी फायनलमध्ये मात्र इंग्लंडनं टीम इंडियाची वाट अडवली. त्यामुळे भारतीय संघाचं वर्ल्ड कप विजयाचं स्वप्न धुळीला मिळालं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.