ख्राइस्टचर्च, 30 नोव्हेंबर: न्यूझीलंड आणि भारत यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना सुरू आहे. या सामन्यात भारताला प्रथम फलंदाजी करताना मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आलं. संपूर्ण संघ 47.3 षटकात 219 धावा करू शकला. भारतीय कर्णधार शिखर धवन आणि शुभमन गिल यांनी संघाला संथ सुरुवात करून दिली. नवव्या षटकात गिल वेगवान गोलंदाज अॅडम मिल्नेच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने 22 चेंडूत दोन चौकारांच्या मदतीने 13 धावा केल्या. शुभमन गिलने या लहानशा खेळीत एक विक्रमही नावावर केला. गिलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतीय सलामीवीरांमध्ये सर्वात वेगवान 500 धावा केल्या. त्याने फक्त 11 डावात ही कामगिरी केली. याबाबतीत त्याने राहुल द्रविड आणि नवज्योत सिंग सिद्धू यांना मागे टाकलं. राहुल द्रविड आणि सिद्धू यांनी ओपनिंग करताना 12 डावात 500 धावा केल्या होत्या. हेही वाचा : ‘मी फक्त 24 वर्षांचा त्यामुळे…’ भारतीय खेळाडूच्या या वक्तव्यानंतर चाहत्यांचा संताप, पाहा काय घडलं? केएल राहुल आणि शिखर धवन यांनी 13-13 डावात, तर सचिन, सेहवाग यांनी 14-14 डावात हा टप्पा गाठला होता. गिलने पहिल्या एकदिवसीय सामन्यात अर्धशतक केलं होतं. त्याने 65 चेंडूत ५० धावांची खेळी केली होती. तर पावसामुळे रद्द झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 42 चेंडूत 45 धावा केल्या होत्या.
एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि निर्णायक असा हा सामना असून न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीला पाचारण केलं. श्रेयस अय्यरने 49 तर वॉशिंग्टन सुंदरने 51 धावा केल्या. या दोघांव्यतिरिक्त इतर भारतीय फलंदाज न्यूझीलंडच्या गोलंदाजीसमोर टिकाव धरू शकले नाही. हेही वाचा : गोलंदाजालाही कळलं नाही, पण केन विल्यम्सनने DRS घेतला अन् हुड्डा बाद झाला न्यूझीलंडकडून अॅडम मिल्ने आणि डेरिल मिशेल यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले. त्यानंतर २२० धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडने १८ षटकात १ बाद १०४ धावा केल्या आहेत. आता पावसामुळे खेळ थांबला आहे.