नवी दिल्ली, 22 डिसेंबर : ‘फिफा’ची फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धा नुकतीच पार पडली. त्यात अर्जेन्टिना टीम विजयी ठरली. या स्पर्धेदरम्यान भारतातही फुटबॉलचं वेड मोठ्या प्रमाणात पहायला मिळाले. जगात दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या असलेला भारत अजूनही ‘फिफा’च्या वर्ल्ड कपसाठी पात्र ठरलेला नाही. प्रत्येक फुटबॉलप्रेमी भारतीयाच्या मनात भारतीय टीम फिफा वर्ल्ड कप कधी खेळेल हा प्रश्न आहे. एका सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फिफाचे चेअरमन जियानी इन्फेंटिनो यांनी 2026 मध्ये होणाऱ्या वर्ल्ड कपमध्ये भारताच्या समावेशाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. जियानी नेमकं काय म्हणाले, हे जाणून घेऊ या. याविषयी ‘ आज तक ’ने वृत्त दिलं आहे. फिफाचे चेअरमन जियानी इन्फेंटिनो हे इंस्टाग्रामच्या माध्यमातून संवाद साधत होते. तेव्हा अनेकांच्या प्रश्नांची उत्तरं ते देत होते. भारत फिफाच्या वर्ल्ड कपमध्ये कधी दिसेल, असं एकाने विचारलं. त्याला उत्तर देताना जियानी असं म्हणाले, की 2026मध्ये होणाऱ्या फिफा वर्ल्ड कपसाठी पात्र होण्याची संधी भारताकडे आहे. ते पुढे म्हणाले, की 2026ला फिफा वर्ल्ड कपमध्ये 32 ऐवजी 48 टीम्स असणार आहेत. परिणामी भारताला पात्र होण्याची संधी आहे. भारतीय चाहत्यांना आश्वस्त करताना जियानी म्हणाले, की भारतात फुटबॉलला प्रोत्साहन मिळावं यासाठी मोठी गुंतवणूक केली जात आहे. तसंच एवढ्या मोठ्या देशात दर्जेदार फुटबॉल स्पर्धा व्हायला पाहिजेत आणि भारताची एक दर्जेदार टीम तयार व्हायला पाहिजे, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली. हे वाचा - अंडे का फंडा मेस्सीसमोर फिका, रोनाल्डोला जमलं नाही ते मेस्सीच्या पोस्टने केलं भारत या स्पर्धेसाठी पात्र कसा होऊ शकेल, हे आता पाहू. 2026 मध्ये होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी अमेरिका, कॅनडा व मेक्सिको हे देश यजमान आहेत. या स्पर्धेत 32 ऐवजी 48 टीम्स सहभागी होणार आहेत. त्या स्पर्धेत एकूण 80 मॅचेस होणार असून सर्वाधिक मॅचेसचं यजमानपद अमेरिकेकडे असेल. हे वाचा - जिथं लाखो प्रेक्षकांनी फिफा वर्ल्डकपचा घेतला आनंद; ते स्टेडियम का होतंय भुईसपाट भारताचं फिफा रॅंकिंग सध्या 106 आहे. म्हणजे रॅंकिंगच्या नियमाने भारत थेट फिफा वर्ल्ड कपसाठी पात्र होऊ शकत नाही. भारताला पात्र होण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागेल. वर्ल्ड कपमध्ये वेगवेगळ्या असोसिएशन्ससाठी टीम्सचे स्लॉट असतात. 48 टीम्स असल्याने आशियाई फुटबॉल असोसिएशनसाठी 8.5 स्लॉट असतील. म्हणजेच 8 आशियाई टीम्स वर्ल्ड कपमध्ये भाग घेऊ शकतात. भारत आशियाई टीम्सच्या यादीत 19व्या नंबरवर आहे. त्यामुळे भारताला अगोदर आशियाई गटासाठी पात्र व्हावं लागेल. पुढे जाण्यासाठी आशियाई गटात अव्वल दोनमध्ये असणं आवश्यक असणार आहे. म्हणजे भारत आशियाई गटासाठी पात्र ठरला तरच तो पुढे जाऊ शकेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.