मुंबई, 24 मार्च : मागच्या काही वर्षांमध्ये शिखर धवन (Shikhar Dhawan) हा मर्यादित ओव्हरच्या क्रिकेटमध्ये नेहमीच टीम इंडियाचा महत्त्वाचा खेळाडू राहिला आहे. धवनने भारताकडून 140 वनडे आणि 65 टी-20 खेळल्या. यात त्याने 5,906 आणि 1,673 रन केल्या आहेत. त्याची वनडेमधली सरासरी 45.43 तर टी-20 मधली सरासरी 27.88 आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये तर बराच काळ धवन टीममध्येही बसत नाही. आता तर टी-20 क्रिकेटमध्येही टीम इंडियाच्या गब्बरचं करियर धोक्यात आलं आहे.
इंग्लंडविरुद्धच्या टी-20 सीरिजमध्ये (India vs England) धवनला फक्त पहिली मॅच खेळण्याची संधी मिळाली. 35 वर्षांचा धवन केएल राहुलसोबत (KL Rahul) ओपनिंगला आला पण इंग्लंडचे फास्ट बॉलर जोफ्रा आर्चर आणि मार्क वूड यांच्या वेगापुढे धवनला संघर्ष करावा लागला. 12 बॉलमध्ये 4 रन करून तो आऊट झाला. यानंतर पुढच्या सामन्यात इशान किशनला (Ishan Kishan) संधी देण्यात आली. या संधीचं किशनने सोनं केलं. आपल्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात किशनने अर्धशतक केलं. तर सूर्यकुमार यादवनेही (Suryakumar Yadav) त्याच्या पहिल्याच इनिंगमध्ये 57 रन आणि दुसऱ्या इनिंगमध्ये 32 रनची खेळी केली.
इशान किशन आणि सूर्यकुमार यांच्या पदार्पणामुळे टीम इंडियाला टॉप-ऑर्डरमध्ये आणखी पर्याय उपलब्ध झाले आहेत. विराट कोहलीला (Virat Kohli) टी-20 सीरिजमध्ये मॅन ऑफ द सीरिज देऊन गौरवण्यात आलं. तर रोहित शर्मा (Rohit Sharma) त्याच्या करियरच्या सर्वोच्च फॉर्ममध्ये आहे. केएल राहुलला सध्या संघर्ष करावा लागत असला तरी त्याची क्षमता बघता तो टीमसोबत असेल.
भारताकडे टॉप-ऑर्डरमधले एवढे खेळाडू असताना धवनला संधी मिळणं कठीण आहे. गेल्या काही दिवसांमध्ये धवनला दुखापतींनी ग्रासलं आहे, तसंच वयही त्याच्या बाजूने नाही. आयपीएलच्या मागच्या मोसमात (IPL 2020) धवनने 44.14 ची सरासरी आणि 144.73 च्या स्ट्राईक रेटने 618 रन केले, पण आयपीएलमध्येही त्याला आंतरराष्ट्रीय फास्ट बॉलरसमोर संघर्ष करावा लागला.
आयपीएल 2020 मध्ये फास्ट बॉलरसमोर धवनची सरासरी आणि स्ट्राईक रेट, कोहली, रोहित, राहुल, किशन आणि सूर्यकुमारपेक्षा कमी होता. जलद बॉलिंगचा सामना करताना धवन जास्त वेळा आऊट झाला, तसंच त्याने 112.2 च्या स्ट्राईक रेटने रन केले.
फास्ट बॉलिंगसमोर धवनची कामगिरी याआधी एवढी खराब नव्हती. आयपीएल 2018 आणि 2019 मध्ये धवनने एकदाही आऊट न होता 147.7 च्या स्ट्राईक रेटने 161 रन केले. ही आकडेवारी बघता धवनची फास्ट बॉलिंगविरुद्धची कामगिरी सध्याच वाईट झाल्याचं दिसून येत आहे. वयामुळे कमी झालेले रिफ्लेक्स हे याचं कारण असू शकतं.
नुकत्याच झालेल्या विजय हजारे ट्रॉफी (Vijay Hazare Trophy) आणि सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेतही (Syed Mushtaq Ali Trophy) धवनची कामगिरी फार चांगली झाली नाही. सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत धवनने 4 इनिंगमध्ये 26.25 ची सरासरी आणि 129.62 च्या सरासरीने 105 रन केल्या. तर विजय हजारे ट्रॉफीमध्ये धवनने 5 मॅचमध्ये 40.60 ची सरासरी आणि 104.63 च्या सरासरीने 203 रन केले, पण यातले 153 रन एकाच इनिंगमधले होते. उरलेल्या 4 इनिंगमध्ये धवनने फक्त 50 रन केले.
गेल्या काही महिन्यांमध्ये धवनची कामगिरी निराशाजनक झाली असली तरी वनडे क्रिकेटमध्ये मात्र कर्णधार विराट कोहलीने त्याच्यावर विश्वास दाखवला आहे. वनडे क्रिकेटमध्ये धवन आणि रोहित ओपनिंगला खेळतील, कारण सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ही जोडी सर्वोत्तम आहे, असं विराट म्हणाला. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्येही धवनने 98 रनची खेळी केली. त्यामुळे वनडे क्रिकेटमध्ये तरी सध्या धवनच्या स्थानाला धोका नाही. पण टेस्टनंतर आता टी-20 फॉरमॅटमध्ये धवनचं खेळणं कठीण झालं आहे.
इशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांच्याशिवाय शुभमन गिल (Shubhaman Gill), पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि देवदत्त पडिक्कल (Devdutt Padikkal) यांनी स्थानिक क्रिकेटमध्ये धमाकेदार कामगिरी केली आहे. गिलने सुरुवातीच्याच काही मॅचमधून टेस्ट क्रिकेटमध्ये आपली छाप पाडली. तर देवदत्त पडिक्कल आयपीएल 2020 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा (RCB), सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत आणि विजय हजारे ट्रॉफीमध्ये कर्नाटकचा सर्वाधिक रन करणारा खेळाडू होता.
भारतीय टीममधून डच्चू मिळालेला पृथ्वी शॉ यानेदेखील विजय हजारे ट्रॉफीमध्ये विक्रमाला गवसणी घातली. विजय हजारे ट्रॉफीच्या एका मोसमात सर्वाधिक रन करण्याचा विक्रम पृथ्वी शॉच्या नावावर झाला. या सगळे खेळाडू त्यांच्या विशीत आहेत, तर धवनचं वय 35 आहे, त्यामुळे भविष्यात या नवोदितांशी स्पर्धा करणं त्याला कठीण जाणार आहे.
शिखर धवनने आयसीसीच्या स्पर्धांमध्ये कायमच उल्लेखनीय कामगिरी केली आहे. 2013 आणि 2017 चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 2015 वर्ल्ड कपमध्ये धवन भारताचा सर्वाधिक रन करणारा खेळाडू होता. पुढच्या तीन वर्षांमध्ये भारत दोन टी-20 आणि एक 50 ओव्हरचा वर्ल्ड कप खेळणार आहे. शरिराने साथ दिली तर यातला 50 ओव्हरचा वर्ल्ड कप धवनसाठी शेवटचा असेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, Ishan kishan, Kl rahul, RCB, Rohit sharma, Shikhar dhawan, Suryakumar yadav, Team india, Vijay hazare trophy