मुंबई, 19 मे : क्रिकेट मॅचच्या दरम्यान एखादी चूकही टीमच्या पराभवाचं कारण ठरू शकते. आयपीएल 2022 मधील बुधवारी झालेल्या मॅचमध्ये तर कोलकाता नाईट रायडर्सनं लखनऊ सुपर जायंट्स विरूद्ध (KKR vs LSG) एकच चूक तीनदा केली. या चुकीमुळे कोलकाताला निर्णायक लढतीत पराभव सहन करावा लागला. या पराभवानं केकेआरचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे.
नवी मुंबईत झालेल्या मॅचमध्ये लखनऊ सुपर जायंट्सनं पहिल्यांदा बॅटींग करत बिनबाद 210 रन केले. लखनऊची केएल राहुल (KL Rahul) आणि क्विंटन डिकॉक (Quinton de Kock) ही ओपनिंग जोडी संपूर्ण 20 ओव्हर्स नाबाद राहिली. हा आयपीएल स्पर्धेतील रेकॉर्ड आहे. लखनऊला हा रेकॉर्ड केकेआरच्या चुकीमुळेच करता आला. केकेआरच्या फिल्डर्सनी डिकॉकला तब्बल 3 वेळा जीवदान दिले.
डिकॉकला पहिलं जीवदान मिळालं तेव्हा तो 10 बॉलमध्ये 12 रन काढून खेळत होता. केकेआरकडून पहिलीच आयपीएल मॅच खेळणाऱ्या अभिजीत तोमरनं थर्ड मॅनला त्याचा कॅच सोडला. डिकॉक 68 रनवर असताना त्याला दुसरं जीवदान मिळालं. त्यावेळी विकेटकिपर सॅम बिलिंग्सनं चूक केली. तर तो 127 रनवर खेळत असताना त्याला तिसरं जीवदान मिळालं. डीकॉकला मिळालेली ही सर्व जीवदान केकेआरसाठी महाग ठरली.
IPL 2022 : सलग पाचव्या वर्षी राहुलची कमाल, 'हा' रेकॉर्ड करणारा एकमेव भारतीय
डिकॉकने 70 बॉलमध्ये 200 च्या स्ट्राईक रेटने नाबाद 140 रन केले. त्याच्या या खेळीमध्ये 10 फोर आणि 10 सिक्सचा समावेश होता. डिकॉकने 59 बॉलमध्ये त्याचं शतक पूर्ण केलं, यानंतर त्याने थेट शेवटचा गियर टाकला. टीम साऊदीच्या 19व्या ओव्हरमध्ये लखनऊने 27 रन ठोकले, यात डिकॉकने 3 आणि राहुलने एक सिक्स मारली. यानंतर रसेलच्या 20 व्या ओव्हरमध्ये डिकॉकने लागोपाठ 4 फोर मारले. केकेआरनं ही मॅच फक्त 2 रननं गमावली. त्यामुळे डिकॉकला तीन संधी देण्याची चूक त्यांना चांगलीच महाग पडली. खराब फिल्डिंगमुळे केकेआर स्पर्धेतून आऊट झाली आहे. तर लखनऊ सुपर जायंट्सला या विजयाचा फायदा झाला असून त्यांनी 'प्ले ऑफ' मध्ये धडक मारली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Ipl 2022, KKR, Lucknow Super Giants