मुंबई, 11 मे : आयपीएल 2022 (IPL 2022) नंतर टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरूद्ध टी20 मालिका (India vs South Africa) खेळणार आहे. ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर महिन्यात सुरू होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपच्या तयारीसाठी आयपीएल नंतरची प्रत्येक मालिका टीम इंडियासाठी महत्त्वाची आहे. भारतीय टीमच्या वर्ल्ड कपच्या तयारीला धक्का बसलाय. टीम इंडियाचा प्रमुख बॅटर सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) ही मालिका खेळण्याची शक्यता कमी आहे. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा सदस्य असलेल्या सूर्यकुमार यादवनं (Suryakumar Yadav) दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतली आहे.
'क्रिकबझ' नं बीसीसीआयमधील सूत्रांच्या आधारे याबाबतचे वृत्त दिले आहे. त्यानुसार सूर्यकुमार यादव किमान चार आठवडे क्रिकेट खेळू शकणार नाही. त्याची दक्षिण आफ्रिका सीरिजसाठी काही अटींवर निवड होऊ शकते, पण त्यासाठी त्याला फिटनेस टेस्टमध्ये पास व्हावं लागेल. आयपीएल 'प्ले ऑफ'च्या दरम्यान दक्षिण आफ्रिका विरूद्धच्या सीरिजसाठी भारतीय टीमची घोषणा केली जाईल.
सूर्यकुमार यादवच्या डाव्या हाताच्या स्नायूला दुखापत झाली आहे. शुक्रवारी गुजरात टायटन्सविरुद्ध झालेल्या सामन्यात सूर्यकुमार यादवला दुखापत झाली. बीसीसीआयच्या मेडिकल टीमशी सल्लामसलत करून सूर्याला उरलेला संपूर्ण मोसम विश्रांतीची गरज आहे, असं मुंबई इंडियन्सने सांगितलं आहे. याआधी अंगठ्याच्या दुखापतीमुळेच सूर्यकुमार यादव या आयपीएलमधल्या पहिल्या दोन मॅचही खेळू शकला नव्हता.
IPL 2022 : 57 मॅचनंतर 'प्ले ऑफ' ची पहिली टीम ठरली, आता तीन जागांसाठी 8 जणांमध्ये जोरदार चुरस
सूर्यकुमार यादव आयपीएलच्या या मोसमात मुंबईचा सर्वाधिक रन करणारा दुसरा खेळाडू आहे. सूर्याने 8 मॅचच्या 8 इनिंगमध्ये 43.29 ची सरासरी आणि 145.67 च्या स्ट्राईक रेटने 303 रन केले, यात त्याने 3 अर्धशतकं झळकावली आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ipl 2022, Suryakumar yadav, Team india