नवी दिल्ली, 23 मार्च: क्रिकेटर के एल. राहुल (KL Rahul) सध्या खराब फॉर्ममुळे क्रिकेट रसिकांच्या टीकेचा धनी ठरत आहे. दरम्यान कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) त्याची पाठराखण केली आहे. ‘खेळाडूचा चांगला फॉर्म आणि खराब फॉर्म याबाबत मला फक्त एकच गोष्ट माहिती आहे. कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना. मला असं वाटतं की क्रिकेटविश्वाच्या बाहेर जे लोक आहेत त्यांच्यात अजिबात संयम नाही आहे. लोकं एखादा खेळाडू खेळण्यात फेल जावा याची वाटच पाहत असतात. एखाद्या खेळाडूचा चांगला फॉर्म नसला तर त्याला आणखी हिणवण्यातच या लोकांना धन्यता वाटते. पण क्रिकेट टीमच्या आतमध्ये आम्ही लोकांना कसं मॅनेज करायचं हे चांगल्या पद्धतीने जाणतो,’ अशा शब्दांत भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने सलामीवीर के. एल. राहुलची पाठराखण करत ट्रोलर्सचा समाचार घेतला. इंग्लंडविरुद्धच्या दौऱ्यात आज पुण्यात पहिली वन-डे खेळवली जाणार आहे त्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या व्हर्च्युअल प्रेस कॉन्फरन्समध्ये विराट बोलत होता. (हे वाचा- सूर्यकुमारसारख्या खेळाडूसाठी विराट कोहलीचा मोठा ‘त्याग’ ) या आधी झालेल्या पाच सामन्यांच्या टी-20 क्रिकेट मालिकेतील चार सामन्यांत राहुलची कामगिरी खराब झाली त्यामुळे पाचव्या सामन्यात त्याला संघात स्थान मिळालं नाही. त्यानंतर इंटरनेटवर ट्रोलर्सनी राहुलवर प्रचंड टीका सुरू केली आणि त्याला ट्रोल केलं. इतकं ट्रोल केलं की त्याच्या फलंदाजीचं तंत्रच चुकीचं असल्याचंही काही जण म्हणू लागले. त्या संदर्भाने पत्रकार परिषदेत प्रश्न आल्यानंतर विराटने राहुलची जबरदस्त पाठराखण करत ट्रोलर्सना सणसणीत उत्तर दिलं. विराट आयपीएलमध्ये ओपनिंगसाठी तयार या मालिकेनंतर सुरू होणाऱ्या आयपीएल टी-20 क्रिकेट मालिकेमध्ये आपल्याला ओपनिंग करायची आहे अशी इच्छा विराटने व्यक्त केली. तो म्हणाला, ‘मी आतापर्यंत तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर बॅटिंग केली आहे आता मी आयपीएलमध्ये पुन्हा ओपनिंग करणार आहे. मला ओपनरची भूमिका नव्याने समजवून घ्यायची आहे. सूर्यकुमार चांगल्या पद्धतीने खेळू शकला तर त्यालाही सलामीला येण्याची संधी मिळू शकते तसं झालं तर संघासाठी जी भूमिका करणं गरजेचं असेल ती मी निभावेन.’ (हे वाचा- इंग्लंडविरोधात ODI मध्ये सर्वांत धमाकेदार खेळी खेळणारे पाच भारतीय खेळाडू ) ‘फालतू गोष्टींकडे दुर्लक्ष करतो’ विराट म्हणाला, ‘बाहेर लोकं काय बोलतात याकडे मी दुर्लक्ष करतो माझ्या दृष्टीने त्या फालतू गोष्टी आहेत. माझ्या करिअरच्या पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत मी त्या प्रकाराला बेकारच मानत राहीन. कोण, काय आणि कधी बोलतंय हे सगळं टीमच्या बाहेरच राहिलं पाहिजे. आम्ही आमच्या खेळाडूंच्या पाठीशी उभे आहोत. त्याचं मनोबल उत्तम राखू. ’
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.