भारताने इंग्लंडविरोधातली (IND vs ENG) कसोटी क्रिकेट (Test Cricket) सामन्यांची मालिका 3-1 अशी जिंकून आता टी-20 (T-20) मालिकाही 3-2 अशी जिंकली आहे. आता दोन्ही संघांदरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांची (ODI) मालिका होणार आहे. 23, 26 आणि 28 मार्च रोजी हे तीन सामने पुण्यात होणार आहेत. इंग्लंडच्या विरोधात एकदिवसीय सामन्यांत भारतीय खेळाडूंनी केलेल्या पाच प्रभावी परफॉर्मन्सवर टाकलेली ही नजर...
रोहित शर्मा (Rohit Sharma) : इंग्लंडविरोधात 2018मध्ये नॉटिंगहॅम इथं पहिल्या एकदिवसीय सामन्यात सलामीचा फलंदाज रोहित शर्माने 269 धावांचा पाठलाग करताना हे लक्ष्य 40.1 ओव्हर्समध्येच साध्य केलं होतं. 114 चेंडूंमध्ये त्याने नाबाद 137 धावांची खेळी केली होती. शिखर धवनने 27 चेंडूंमध्ये वेगवान 40 धावा जोडल्या होत्या. विराटने 82 चेंडूंत 75 धावा केल्या होत्या. त्या सामन्यात कुलदीप यादवने सहा बळी घेतले होते.
युवराजसिंग (Yuvrajsingh) : जानेवारी 2017मध्ये 35 वर्षांच्या युवराजसिंगने इंग्लंडच्या विरोधात कटकमध्ये दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 127 चेंडूंमध्ये नाबाद 150 धावांची खेळी केली होती. युवराजने 21 चौकार आणि तीन षट्कार लगावले होते. इंग्लंडने कडवा प्रतिकार केला होता; मात्र शेवटी इंग्लंडला 15 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
नवज्योतसिंग सिद्धू (Navjyotsingh Siddhu) : मे 1993मध्ये 250 धावांचं लक्ष्य गाठणंही खूप अवघड मानलं जाई. सात एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतल्या ग्वाल्हेरमध्ये खेळल्या गेलेल्या सहाव्या सामन्यात सिद्धूने नाबाद 134 धावा केल्या होत्या. कर्णधार अजहरुद्दीनने 75 धावा केल्या होत्या. इंग्लंडचा सलामीचा फलंदाज रॉबिन स्मिथने 129 धावा केल्या होत्या. (Navjot Singh Sidhu/Instagram)
वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) : 2002च्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारताला 270 धावांचं लक्ष्य गाठायचं होतं. त्या वेळी सेहवागने 104 चेंडूंमध्ये 126 धावांची खेळी केली. त्याने 21 चौकार आणि एक षट्कार ठोकला. त्याच सामन्यात सौरव गांगुलीने 109 चेंडूंमध्ये 117 धावा केल्या होत्या. सेहवाग आणि गांगुली यांनी पहिल्या विकेटसाठी 192 धावांची भागीदारी केली होती.
सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) : 2011ची वर्ल्ड कप स्पर्धा सचिन तेंडुलकरसाठी सहावी आणि शेवटची वर्ल्ड कप स्पर्धा होती. त्या वेळी सचिनने बेंगळुरूमध्ये 115 चेंडूंमध्ये 120 धावांची खेळी केली. त्यात 10 चौकार आणि पाच षट्कारांचा समावेश होता. गौतम गंभीरने 51, तर युवराजसिंगने 58 धावांची खेळी केली होती. त्या सामन्यात एकदा असं वाटलं होतं, की भारताची धावसंख्या 350पर्यंत पोहोचेल; पण 338 धावसंख्येवर सर्व संघ बाद झाला. एवढी मोठी धावसंख्या करूनही हा सामना अनिर्णित राहिला होता.