पुणे, 22 मार्च : नुकत्याच अहमदाबादमध्ये झालेल्या टी-20 क्रिकेट मालिकेत भारतीय क्रिकेट संघाने पाहुण्या इंग्लंड संघाचा (IND vs ENG) 3-2 असा पराभव केला. या मालिकेत सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) सलामीला येऊन चांगली फलंदाजी केली. त्याचा त्याला भविष्यात फायदा होऊ शकतो. शेवटच्या टी-20 सामन्यात कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) यांनी डावाची सुरुवात करून चांगली भागीदारी केली होती. त्यामुळे या पुढेही हीच जोडी सलामीला येईल अशी शक्यता व्यक्त होत आहे. सोमवारी संध्याकाळी झालेल्या व्हर्च्युअल प्रेस कॉन्फरन्समध्ये विराटने अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. एएनआयने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
रोहित आणि त्याच्या सलामीबद्दल तो म्हणाला, ‘ सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे संघात कोण खेळणार याच्याशी जसा संघ व्यवस्थापनाचा काहीही संबंध नसतो तसंच संघावर कोणती जोडी चांगलं खेळेल याच्याशी निवड समितीचा संबंध नसतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जसं रोहितनी सांगितलं तसंच ही आमची रणनीति होती की आम्ही दोघांनी सलामीला बॅटिंग करावी. आम्ही दोघांनी फलंदाजी एंजॉय केली आणि आम्ही दोघं सामनाभर खेळतच राहिलो तर प्रतिस्पर्धी संघाची काय हालत करू शकतो हे ही सिद्ध झालं. आता हीच जोडी कायम राहिल का याबाबत आताच सांगता येणार नाही.’
टी-20 फॉरमॅटमधली विराटची फलंदाजी आणि सूर्यकुमारची फलंदाजी याबद्दलही विराटनी आपलं मत स्पष्ट केलं. तो म्हणाला, ‘ आयपीएलमध्ये सर्व पर्याय खुले रहावेत म्हणून या पुढेही मी टी-20 क्रिकेट सामन्यात सलामीला खेळायला येणार आहे. मी तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर खेळलोय आणि आता मला पुन्हा सलामीवीराची भूमिका समजवून घ्यायची आहे. या आधीही मी सलामीला आलो होतो आणि यशस्वीही झालो होतो. त्यामुळेच जर सूर्यकुमार अशाच पद्धतीने फलंदाजी करत राहिला तर त्याला सलामीला येण्याची संधी मी देऊ शकतो. मग संघाला हवी असलेली भूमिका साकारेन. जेव्हा टी-20 वर्ल्ड कप जवळ येईल तेव्हा आम्ही याबद्दल चर्चा करू. आता आयपीएलमध्ये सलामीवीर म्हणून माझा खेळ कसा होतो हे पहावं लागेल.’
संघ टी-20 वर्ल्ड कपची तयारी करत असताना मध्येच वन-डे सामने आले आहेत का असं विचारल्यावर विराट म्हणाला, ‘ हे बघा सामन्यांचं नियोजन करणं हे आमच्या हातात नाही. आमच्या दृष्टीनी कोणताही आंतरराष्ट्रीय सामना खेळणं ही आम्हाला देशाचं प्रतिनिधित्व करायला मिळालेली संधी आहे आणि ती अत्यंत मौल्यवान आहे. पण सध्याच्या परिस्थितीत सगळंच अचानक घडतंय त्यामुळे नियोजनात असं झालं असू शकतं. आताही शाश्वती कुठे आहे कधीही बबल्सच्या वातावरणात क्रिकेट खेळायला लागू शकतं. कोणताही खेळाडू किती क्रिकेट खेळतो याचा विचार होणं महत्त्वाचं आहे. केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिकदृष्ट्याही विचार व्हायला हवा. त्यासंबंधी खेळाडूंशी चर्चा व्हायला हवी. नाहीतर अशी वेळ येईल की सतत खेळूनही जो टिकेल त्याचास संधी मिळेल आणि तो टिकला नाही तर त्याची जागा दुसरा खेळाडू घेईल. पण एकूणात क्रिकेटमधील यंत्रणेलाही हे फारसं हितकारक नसेल.’
IND vs ENG : टीम इंडियासोबत असलेली ही मुलगी कोण, माहिती आहे का?
उद्या 23 मार्चला होणारी वन-डे पुण्यात होत आहे आणि महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडत आहेत त्यामुळे खेळाडूंच्या मनांत साशंकता नाही ना? या प्रश्नावर विराट म्हणाला, ‘ आम्ही विविध ठिकाणी आतापर्यंत खेळलो. दोन ठिकाणचे सामने यशस्वी झाले. आता पुण्यातील सामनेही यशस्वी होतील. कोरोनापासून बचावासाठी सर्व काळजी खेळाडू घेत आहेत. आमच्यासाठीचा मेडिकल सेटअप उत्तम आहे. हॉटेल किंवा बबल्समध्ये राहताना खेळाडूंना अजिबात भीती वाटलेली नाही. खेळाडूंना याची पुरेपूर जाणीव आहे की सुरक्षित राहण्याची किंमत काय आहे. त्यामुळे आम्ही यानंतर आयपीएलही व्यवस्थितपणे पूर्ण करू.’
इंग्लंडविरोधात ODI मध्ये सर्वांत धमाकेदार खेळी खेळणारे पाच भारतीय खेळाडू
भारतीय वन-डे क्रिकेट संघ – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, क्रुणाल पंड्या, युजवेंद्र चहल, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), के. एल. राहुल (यष्टिरक्षक), कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, टी. नटराजन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, प्रसिदध कृष्णा, शार्दुल ठाकूर.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.