मुंबई, 8 डिसेंबर : भारतीय वन-डे क्रिकेट टीम सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. दोन्ही देशांदरम्यान तीन मॅचेसची वन-डे सीरिज खेळवली जात आहे. या सीरिजमधली दुसरी मॅच काल (7 डिसेंबर) झाली. त्यामध्ये टीम इंडियाचा पराभव झाला. या पराभवासह बांगलादेश विरुद्धची वन-डे मालिका गमावण्याची नामुश्की टीम इंडियावर आलीय. या नामुश्कीनंतर टीम इंडियासाठी आणखी एक वाईट बातमी आहे.
कॅप्टन रोहित शर्मा, दीपक चहर व कुलदीप सेन दुखापतीमुळे सीरिजमधल्या तिसऱ्या मॅचमधून बाहेर पडले आहेत. वन-डे सीरिजनंतर होणाऱ्या टेस्ट सीरिजमध्येदेखील रोहित शर्मा खेळेल की नाही, याबाबत शंका आहे. हे तिन्ही खेळाडू तिसऱ्या मॅचमधून बाहेर पडल्याच्या वृत्ताला कोच राहुल द्रविड यांनी दुजोरा दिला आहे. दरम्यान, रोहित शर्मा उपचारांसाठी मुंबईला परत येणार आहे. 'क्रिकेट कंट्री'ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
दुसऱ्या वन-डे मॅचदरम्यान बांगलादेशची बॅटिंग सुरू झाल्यानंतर दुसऱ्याच ओव्हरमध्ये झेल घेण्याचा प्रयत्न करताना रोहितच्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली. त्याच्या अंगठ्यातून रक्तस्राव होताना दिसला. त्यामुळे भारताच्या डावाची सुरुवात करण्यासाठीदेखील तो आला नाही. त्याच्या जागी विराट कोहली आणि शिखर धवन यांनी ओपनिंग केलं. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, त्याला स्कॅनसाठी पाठवण्यात आलं होतं.
बांगलादेशविरुद्ध पराभवानंतर ICCचा भारताला आणखी एक दणका, रोहितने मान्य केली चूक
रोहितची एकाकी झुंज
उद्दिष्टाचा पाठलाग करताना टीम इंडियाची अवस्था अत्यंत कठीण असताना जखमी रोहित नवव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला. त्याने केवळ 28 बॉलमध्ये नॉट आउट 51 रन्स करून भारताला विजयाच्या उंबरठ्यावर नेलं होतं. भारताला विजयासाठी दोन बॉलमध्ये 12 रन्सची आवश्यकता त्यानं एक सिक्सर ठोकला; मात्र शेवटच्या बॉलवर त्याला फक्त एकच रन काढता आला. परिणामी बांगलादेशने मॅच आणि सीरिजही जिंकली.
ढाक्यातल्या दुसऱ्या वन-डे मॅचमध्ये केवळ तीन ओव्हर्स टाकणारा दीपक चहर आणि कुलदीप सेन हे खेळाडूदेखील शेवटची मॅच खेळू शकणार नाहीत. गेल्या चार महिन्यांमध्ये जखमी होण्याची दीपक चहरची ही तिसरी वेळ आहे.
तुम्ही फक्त वऱ्हाडी गोळा करताय; टीम इंडियाच्या निवडीवर माजी क्रिकेटपटू संतापला
रोहितवर प्रश्नचिन्ह
मॅचनंतर झालेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये कोच राहुल द्रविड यांनी रोहितच्या फिटनेसबाबत माहिती दिली. द्रविड म्हणाले, "रोहित पुढची मॅच नक्कीच खेळू शकणार नाही. तो मुंबईला परत जाऊन तज्ज्ञांशी सल्लामसलत करील. तो टेस्ट सीरिजसाठी परत येऊ शकेल की नाही याची मला खात्री नाही. आज जखमी असूनही त्याने अप्रतिम खेळ केला. हाताला टाके असूनदेखील इंजेक्शन घेऊन त्याने मैदानावर उतरण्याचं धाडस केलं."
दरम्यान, पाठोपाठ पराभव होत असूनही, द्रविड यांनी टीम इंडियाची पाठराखण केली. भविष्यात टीम नक्कीच चांगली कामगिरी करील असा विश्वास द्रविड यांनी व्यक्त केला. याशिवाय, त्यांनी वॉशिंग्टन सुंदर, श्रेयस अय्यर, उमरान मलिक यांच्या कामगिरीचं कौतुकही केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bangladesh, Cricket news, Rohit sharma, Team india