मुंबई, 11 नोव्हेंबर: इंग्लंडविरुद्धच्या लाजीरवाण्या पराभवानंतर आता भारतीय टी20 संघात बदल होणार हे मात्र निश्चित मानलं जात आहे. या टीममधून अनेक सिनियर खेळाडू संघाबाहेर जाण्याची चिन्ह आहेत. बीसीसीआयच्या एका सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार पुढच्या वर्षभरात भारतीय टी20 संघात मोठे बदल पाहायला मिळतील. रोहित शर्मा, विराट कोहली, दिनेश कार्तिक आणि अश्विनसारखे सिनियर खेळाडू हळूहळू टी20 संघाबाहेर जातील. इतकच नव्हे तर एका नव्या कर्णधाराच्या नेतृत्वात युवा टीम इंडिया मैदानात उतरण्याची शक्यता आहे.
रोहितनंतर कोण होणार टी20 कॅप्टन?
गेल्या वर्षी विराट कोहलीनंतर रोहित शर्माकडे टी20 संघाची धुरा सोपवण्यात आली. रोहित या फॉरमॅटमध्ये यशस्वी कर्णधारांपैकी एक मानला जातो. आयपीएलमध्ये त्यानं पाच वेळा मुंबई इंडियन्सला जिंकून दिलं आहे. इतकच नव्हे तर आंतरराष्ट्रीय टी20तही कॅप्टन म्हणून त्याचं रेकॉर्ड उत्तम आहे. पण आता पुढच्या टी20 वर्ल्ड कपचा विचार करायचा झाल्यास रोहितऐवजी बीसीसीआयला नवं नेतृत्व शोधावं लागेल. आगामी वर्ल्ड कपसाठी सिनियर खेळाडूंऐवजी युवांनाच संधी मिळण्याची आता जास्त शक्यता आहे. आणि कर्णधारपदासाठी हार्दिक पंड्याचं नाव चर्चेत आहे.
हेही वाचा - Ind vs Eng: चाहत्यांचा हार्ट ब्रेक, रोहित शर्माही रडला; पण 'हा' खेळाडू होतोय जोरदार ट्रोल
हार्दिक भारताचा टी20 कॅप्टन?
सध्या हार्दिक पंड्या हा टीम इंडियाच्या अनुभवी खेळाडूंपैकी एक आहे. टी20तला त्याचा फॉर्मही जबरदस्त आहे. पुढच्या वर्ल्ड कपआधी भारतीय संघाची नव्यानं बांधणी करायची झाल्यास हार्दिक हा कर्णधारपदासाठी उत्तम पर्याय आहे. आगामी न्यूझीलंड दौऱ्यासाठी त्याच्याकडे नेतृत्व देण्यात आलं आहे. कदाचित तिथून पुढे प्रत्येक टी20 मालिकेत पंड्याच भारताची कमान सांभाळताना दिसू शकतो. गेल्या आयपीएलमध्ये त्यानं गुजरात टायटन्सचं नेतृत्व करताना पहिल्याच प्रयत्नात संघाला विजेतेपद मिळवून दिलं होतं. त्यामुळे नवा कॅप्टन म्हणून हार्दिकच्याच नावाची चर्चा सध्या जास्त आहे.
हेही वाचा - T20 World Cup : भारताच्या पराभवाचा शेजाऱ्यांना आनंद, पाकिस्तानी पंतप्रधानांनी जखमेवर मीठ चोळलं!
सिनियर खेळाडूंचं भवितव्य काय?
पुढच्या वर्षी भारतात वन डे वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. त्यामुळे रोहित, विराटसारख्या खेळाडूंना केवळ वन डे आणि कसोटी मालिकांमध्येच आता स्थान मिळू शकतं. त्यानंतर 2024 साली टी20 वर्ल्ड कप होणार आहे. पण त्यावेळी भारतीय संघात रोहित शर्मा, विराट कोहली, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, दिनेश कार्तिक, रवीचंद्रन अश्विन या सिनियर खेळाडूंना जागा मिळणार का? असा सवाल उपस्थित होतोय. यासंदर्भात काल सामना संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत टीम इंडियाचे कोच राहुल द्रविड यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी द्रविड यांनी इतक्या लवकर याबाबत बोलणं उचित ठरणार नाही, पुढच्या वर्ल्ड कपसाठी अजून बराच वेळ असल्याचं म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sports, T20 world cup 2022