मुंबई, 26 नोव्हेंबर: टीम इंडियाच्या टी20 वर्ल्ड कपमधल्या खराब प्रदर्शनानंतर बीसीसीआयनं एकेक बदल करण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी बीसीसीआयनं अख्खी निवड समिती बरखास्त केली. त्यानंतर नव्या निवड समितीसाठी अर्जही मागवले. पण आता बीसीसीआयनं आणखी एक मोठं पाऊल उचललं आहे. मिळालेल्या माहितीनुसार टीम इंडियाचे मेंटल स्ट्रेन्थ अँड कन्डिशनिंग कोच पॅडी अप्टन यांची विकेट पक्की समजली जात आहे. पॅडी अप्टन यांचं कॉन्ट्रॅक्ट न वाढवण्याचा निर्णय बीसीसीआयनं घेतला आहे.
वर्ल्ड कपसोबत कॉन्ट्रॅक्टही समाप्त
राहुल द्रविड यांच्या शिफारसीवरुन जुलै महिन्यात पॅडी अप्टन भारतीय संघासोबत जोडले गेले होते. आशिया कप आणि वर्ल्ड कपमध्येही ते टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये होते. पण वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया हरली आणि पॅडी यांचं कॉन्ट्रॅक्टही संपलं. त्यानंतर बीसीसीआयनं त्यांचा करार पुढे न वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आगामी बांगलादेश दौऱ्यावर पॅडी अप्टन हे टीम इंडियासोबत असणार नाहीत.
पॅडी अप्टनमुळे विराट फॉर्मात
टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीला पुन्हा फॉर्ममध्ये आणण्याचं मोठं श्रेय पॅडी अप्टन यांना जातं. ते जुलै महिन्यात टीम इंडियामध्ये आले. त्यानंतर आशिया कपपासून विराट कोहलीचा फॉर्म परत आला. आशिया कपममध्ये विराटनं धावांचा आणि शतकांचा दुष्काळ तीन वर्षांनी संपवला. तर वर्ल्ड कपमध्येही त्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडला. या सगळ्यामागे पॅडी अप्टन यांचा मोठा हातभार आहे. पण इंग्लंडविरुद्ध टीम इंडिया वर्ल्ड कपच्या मैदानात हरली आणि त्यांचा करारही संपला.
हेही वाचा - IPL 2023: बीसीसीआयनं IPL रजिस्ट्रेशनसाठी दिली डेडलाईन, हे दिग्गज खेळाडूही उतरणार लिलावात
पॅडी अप्टन यांची कारकीर्द
दक्षिण आफ्रिकेचे पॅडी अप्टन हे 2008 साली पहिल्यांदा भारताचे स्ट्रेन्थ अँड कंडिशनिंग कोच बनले. त्यावेळी गॅरी कर्स्टन हे भारताचे मुख्य प्रशिक्षक होते. या जोडीनं तीन वर्षात भारतीय क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर नेलं. इतकच नव्हे तर या दोघांच्या मार्गदर्शनाखाली आणि धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियानं 2011 साली वन डे वर्ल्ड कप जिंकला होता.
हेही वाचा - FIFA WC 2022: रोनाल्डोच्या आयुष्याचे 5 नियम... म्हणून दारु, सिगरेट आणि टॅटूपासून दूर आहे हा स्टार फुटबॉलर!
आयपीएलमध्येही जबाबदारी
त्यानंतर पॅडी अप्टन यांनी वेगवेगळ्या आयपीएल फ्रँचायझीजसाठी कोच म्हणून काम पाहिलं. सध्या ते राजस्थान रॉयल्सचे मुख्य प्रशिक्षक आहेत. पण त्याआधी त्यांनी पुणे वॉरियर्स, दिल्ली डेअरडेव्हिल्स या संघांचं प्रशिक्षकपदही सांभाळलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Cricket news, Sports, Team india