मराठी बातम्या /बातम्या /religion /हिंदू धर्मानुसार शंखाचे महत्त्व

हिंदू धर्मानुसार शंखाचे महत्त्व

दक्षिणावर्ती शंखाची पूजा ज्या घरात होते, तेथे कायम मंगलमय वातावरण राहते.

दक्षिणावर्ती शंखाची पूजा ज्या घरात होते, तेथे कायम मंगलमय वातावरण राहते.

दक्षिणावर्ती शंखाची पूजा ज्या घरात होते, तेथे कायम मंगलमय वातावरण राहते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 09 फेब्रुवारी :  घरात, देवळात, शुभप्रसंगी, मिरवणुकीत आणि विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी शंख वाजवला जातो. शंखनाद आणि घंटानाद हे मंगलध्वनी आहेत. ब्रह्मांडातील शुभ लहरींना चालना देण्याची व निगेटिव्ह, अशुभ लहरींना बाहेरचा मार्ग दाखवण्याची क्षमता शंखनाद व घंटानादात नक्की आहे.

साक्षात लक्ष्मीचा सहोदर (भाऊ ) असणार्‍या दक्षिणावर्ती शंखाची पूजा ज्या घरात होते, तेथे कायम मंगलमय वातावरण राहते.

शंख हा समुद्रात सापडतो. शंख विजय, समृद्धी, आनंद, शांती, प्रसिद्धी, कीर्ति आणि लक्ष्मी यांचे प्रतीक मानले जाते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शंख हे नादांचे प्रतीक आहे. हा शंख भगवान विष्णूला समर्पित होता. म्हणूनच  लक्ष्मी-विष्णू (श्रीलक्ष्मी नारायण) पूजेमध्ये मूलत: शंख वाजविला ​​जातो.

देवपूजेपूर्वी शंखाची पूजा करण्याचा प्रघात आहे. दक्षिणावर्ती शंखामध्ये आदल्या दिवशी  पाणी भरून ठेवावे आणि त्यात कापूर टाकावा व त्या पाण्याने दुसऱ्या दिवशी देवपूजेच्या वेळी देवांना स्नान घालावे. त्यामुळे लक्ष्मी प्राप्ती होते .

 दक्षिणावर्ती शंख ‘अष्टमी’ किंवा ‘चतुर्दशीस’ विधिवत पूजा करून आपल्या देव्हार्‍यात किंवा तिजोरीत स्थापन करावा.

 राज्य, धन, कीर्ती, आयुष्य, शत्रूवर जय, कोर्टकचेर्‍यांमध्ये यश, पती-पत्नी नातेसंबंध यापैकी अपेक्षित फलप्राप्तीकरिता शंखनाद केला जातो.

शंखातील पाण्याने अनेक व्याधी नाहीशा होतात. आयुर्वेदात अनेक व्याधींवर शंखभस्माचा उपयोग सांगितला आहे.

 क्षिणावर्ती शंख धान्य भांडारामध्ये तसेच तिजोरीत,  वस्त्र भांडारामध्ये ठेवल्याने कधीच कमतरता भासत नाही.

यामध्ये शुद्ध, पवित्र पाणी भरून व्यक्ती व वस्तूवर शिंपडल्याने दुर्भाग्य, अभिशाप, तंत्र-मंत्र इत्यादींचा प्रभाव समाप्त होतो. कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती या शंखाच्या प्रभावासमोर निष्फळ ठरतात.

शंखाचे प्रकार व जाती: शंखाचे  मुख्यत: दोन प्रकार असतात. पहिला दक्षिणावर्ती (उजवा) शंख पूजेसाठी आणि शंखनाद करण्यासाठी  वामावर्ती (डावा) शंख असे दोन शंख देवघरात ठेवावेत.

दक्षिणावर्ती शंख घरामध्ये ठेवल्याने सर्व प्रकारची नकारात्मक उर्जा स्वतः नष्ट होते आणि सकारात्मक उर्जा वाढते. पंरतु वामावर्ती शंख  नुसताच आणून न ठेवता शंखनाद करावा. शंखनादामुळे वातावरणात ज्या चैतन्य लहरी निर्माण होतात त्यामुळे वास्तूतील नकारात्मक लहरी नष्ट होतात व आपल्या वास्तूत पवित्र लहरी येऊ लागतात.

 शंख कसा ठेवावा ?

शंखाचा निमुळता चोचीसारखा /पन्हळीसारखा भाग उत्तर दिशेला करावा.

शंख अर्थातच पोकळ बाजू वर करुन ठेवावा म्हणजे त्यात पाणी राहील.

वाजण्याकरता घेतलेला शंख पूजत नाहीत. तो निव्वळ "शंखध्वनी" करण्याकरताच वापरावा. शंखाची  पूजा  करायची झाल्यास दक्षिणावर्ती शंखाची पुजा करावी.

शंखाला हळदकुंकू वहात नाहीत. तसेच गंधाक्षतफूल न वाहता, निव्वळ गंध फुल वहावे, शक्यतो पांढरे फूल वहावे.

मंदिरात आरतीपूर्वी शंखनाद अवश्य केला जातो. तो शंखनाद केल्या नंतर आरती केली जाते.

शास्त्र :

शंखनादाने प्राणायमाचा अभ्यास तर होतोच; शिवाय शंखनाद जेथपर्यंत ऐकू जातो, त्या परिसरात भूत, पिशाच्च वगैरे वाईट शक्तींचा त्रास होत नाही.

शंखाचे महत्त्व आणि उपयुक्तता-

शंखध्वनींमुळे उत्पन्न होणार्‍या कंपनांमुळे सभोवतालचे वातावरण शुद्ध व पवित्र होते. तसेच तो फुंकणार्‍या व्यक्तीच्या हृदयाची व फुप्फुसाची क्षमता वाढून तेज व ओजवृद्धी होते.

दक्षिणावर्ती शंख दुर्मिळ असल्याने त्याच्या किंमती अधिक असतात. शंखाची योग्य ती परीक्षा करूनच तो खरेदी करावा कारण बाजारात हल्ली खूप बनावटी शंख विक्रीसाठी आहेत. कृपया खोट्या व बनावटी वस्तूंना बळी पडू नये.

शंख वाजवण्यासाठी स्त्री - पुरुष असे कोणतेही बंधन नाही. स्त्रियापण शंख वाजवतात.

                                                                                                                                    योगिनी  डॉ. स्मिता राऊत

                                                                                                                                         ज्योतिषी   

                                                                                                                                                                    

 

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Rashichakra, Religion