पुणे, 24 जानेवारी : पुणे शहर हे अती प्राचीन संस्कृतींचं शहर म्हणून ओळखलं जातं. पुण्यात विविध धार्मिक स्थळं आहेत. अष्टविनायकांपैकी 5 गणपती हे पुणे जिल्ह्यात आहेत. त्याचबरोबर देवीचे आणि मारुतीची ऐतिहासिक मंदिरं पुणे जिल्ह्यात आहेत. गणेश जयंतीच्या निमित्तानं पुणे शहरातील कोणत्या 5 गणपती बाप्पाचं दर्शन तुम्ही घ्यायला हवं ते पाहूया
कसबा गणपती
पहिला मानाचा गणपती म्हणजे पुण्यातील ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपती! जिजाऊ माँ साहेबांनी श्रींच्या मंदीराचा जीर्णोद्धार केला. यामुळे या मंदिराला ऐतिहासिक महत्त्व जास्त आहे. पुणे शहर पुन्हा बसवण्यासाठी जिजाऊ माँ साहेबांनी पुण्यावरती सोन्याचा नांगर फिरवला होता. त्याचवेळी त्यांनी कसबा गणपतीचा देखील जीर्णोद्धार केला. हा गणपती स्वयंभू आहे. ही मूर्ती तांदळा एवढी होती. आता शेंदूर लेपल्यामुळे ती सुमारे साडेतीन फूट उंचीची झालेली आहे अशी आख्यायिका आहे. तसेच या मूर्तीचे डोळे हिऱ्यांचे आणि नाभी माणकाची आहे. गणेशोत्सवात पहिल्या मानाचा गणपती म्हणून देखील कसबा गणपती ओळखला जातो.
बाप्पाच्या सजावटीसाठी खरेदी करा जगप्रसिद्ध Eco Friendly मखर, Video
कुठे आहे मंदिर : 159, कसबा पेठ रोड, शनिवारवाड्याजवळ, फडके हौद, कसबा पेठ पुणे - 411011
सारसबाग
पुण्यामध्ये नवसाला पावणारा गणपती म्हणून सारसबाग येथील सिद्धिविनायक गणेश ओळखला जातो. हा गणपती उजव्या सोंडेचा आहे. नानासाहेब पेशवे यांनी आंबील ओढ्याजवळ एक कृत्रिम तलाव बांधला होता. त्या तलावामध्ये त्यांनी श्री सिद्धिविनायक गणेशाची स्थापना केली. त्यामुळे हा गणपती तळ्यातला गणपती म्हणून देखील ओळखला जातो. सारसबागच्या गणपतीचा गणेशोत्सव गणेश जयंती म्हणजे माघी गणेश उत्सवामध्ये साजरा होतो. हा गणपती उजवा सोंडेचा असल्यामुळे हा गणपती नवसाला पावतो. अशी असंख्य भाविकांचे श्रद्धा आहे.
कुठे आहे मंदिर : सारसबाग रोड, नेहरु स्टेडिअम जवळ, सदाशिव पेठ, पुणे - 411030
श्रीमंत दगडुशेठ गणपती
पुण्यात आलेला प्रत्येक गणेशभक्त श्रीमंत दगडुशेठ गणपतीचं हमखास दर्शन घेतो. श्रीमंत दगडूशेठ यांना त्यांच्या गुरुंनी हे मंदिर बांधण्याचा आदेश दिला होता. या मंदिराचा गणेशोत्सवाच्या काळातील देखावा पाहण्यासाठी जगभरातील भाविक येतात. तसंच या मंडळाची विसर्जन मिरवणूक देखील प्रेक्षणीय असते.
228 तोळे सोन्याचा खास पाळणा, गणेश जन्म सोहळ्यासाठी दगडुशेठ मंदिर सजले
त्रिशुंडी गणपती
त्रिशुंड्या गणपती हे पुण्यातील सोमवार पेठेत असलेलं एक महत्त्वाचं मंदिर आहे. हे मंदिर गिरी गोसावी पंथाचे आहे. गणपतीला तीन सोंड असून मयूरावर त्रिशुंड गणपती बसलेला आहे. तीन शुंडांपैकी उजवी सोंड खालच्या हातात असलेल्या मोदकपात्रास स्पर्श करीत आहे. मधली सोंड पोटावर रुळत आहे आणि डावी सोंड डाव्या मांडीवर बसलेल्या शक्तीच्या हनुवटीस स्पर्श करीत आहे. या मंदिराची शिल्पकला पाहण्यासारखी आहे.
कुठे आहे मंदिर : कमला नेहरू हॉस्पिटलजवळ, सोमवार पेठ, पुणे - 411002
दशभुजा गणपती
पुण्याच्या कोथरुड भागातील हे महत्त्वाचे गणेश मंदिर आहे. उत्तर पेशवाईत हरिपंत फडके यांनी हे मंदिर बांधून दुसऱ्या बाजीरावाच्या ताब्यात दिले. हा गणपती नवसाला पावतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. हा गणपती उजव्या सोंडेचा आणि दहा हात असलेला आहे. यामुळे या गणपतीला दशभूजा गणपती असे म्हणतात. गणपती बसलेला असून, उजवा पाय दुमडून जवळ घेतलेला आणि डाव्या पायाची मांडी घातलेला आहे.
कुठे आहे मंदिर : महर्षी कर्वेनगर रोड, पांडुरंग कॉलनी, एरंडवणे, पुणे - 411004
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Local18, Maghi Ganesh Jayanti, Pune, Religion, Temple