विशाल झा, प्रतिनिधी गाझियाबाद, 17 जुलै : श्रावण महिना हा महादेवांना समर्पित असतो. या महिन्यात त्यांची विशेष पूजा केली जाते. याच महिन्यात कावड यात्राही निघते. या यात्रेत भाविक गंगा नदीतून पाणी भरतात आणि शिवमंदिरात शिवलिंगाला अर्पण करतात. या यात्रेदरम्यान भाविकांना पायी प्रवास करावा लागतो. या भाविकांना कावडीया म्हणतात. उत्तर भारतात 4 जुलैपासून श्रावण सुरू झाल्याने यंदाची कावड यात्रा 5 जुलै रोजी निघाली. भारतात अनेकजण देव मानतात, तर अनेकजण देव मानत नाहीत. काही शास्त्रज्ञही देवावर विश्वास ठेवतात. उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद भागातील कान, नाक, घशाचे तज्ज्ञ डॉक्टर असलेले बृजपाल त्यागी यांची महादेवावर प्रचंड श्रद्धा आहे. पूर्वी ते कावड यात्रेला जायचे. मात्र कामाचा व्याप वाढल्यानंतर त्यांना या यात्रेला जाणं शक्य व्हायचं नाही. त्याबाबत त्यांच्या मनात खंत असायची, परंतु त्यांना वेळ मिळायचा नाही. मात्र एकदा स्वतः महादेवांनी स्वप्नात येऊन कावड यात्रा पुन्हा सुरू करण्याचा आदेश दिल्याचं डॉक्टर सांगतात.
महादेवांच्या आदेशानंतर बृजपाल त्यागी यांनी कावडीयांची सेवा करण्यास सुरुवात केली. कावड यात्रेत ते रुग्णवाहिका आणि इतर प्रथमोपचारांची व्यवस्था करतात. शिवाय कावडीयांची स्थिती गंभीर असल्यास त्यांना रुग्णालयात आणून त्यांच्यावर मोफत उपचारही केले जातात. अडचणींचा सामना करत असाल तर…, ‘हा’ आहे चमत्कारी उपाय करून पाहा! डॉ. बृजपाल त्यागी म्हणतात, ‘कावडीयांची सेवा करताना मला मी स्वतः हरिद्वारहून पाणी आणून महादेवांना अर्पण करतोय असं वाटतं. यामुळे माझ्या मनातील खंतही आपोआप कमी झाली आहे. ही सगळी महादेवांची कृपा आहे. तेच माझ्याकडून ही सेवा करवून घेत आहेत.’