नीलम काराळे, प्रतिनिधी
पुणे, 19 मार्च : मराठी नववर्ष दिन म्हणून आपण चैत्र महिन्याचा पहिला दिवस साजरा करतो. याच दिवसाला आपण गुढीपाडवा देखील म्हणतो. विशेष म्हणजे गुढीपाडवा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. या मुहूर्तावरती केलेले कोणतेही चांगले काम किंवा खरेदी ही शुभ मानली जाते. यामुळे गुढीपाडव्याला विशेष महत्त्व असते. गुढीपाडव्याच्या दिवशी विविध प्रतीकांनी ही गुढी सजवली जाते. पुण्यातील ज्योतिषाचार्य जितेंद्र गलांडे यांनी ही गुढी कशी उभारावी आणि यावर्षी गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे याबद्दल माहिती दिली आहे.
काय आहे आख्यायिका?
पुराणात या बाबतीत आख्यायिका आहे. ब्रह्मदेवांनी गुढीपाडव्याच्या दिवशी विश्वाची निर्मिती केली होती. म्हणून गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो. तसेच गुढीपाडव्याच्या दिवसापासून वसंत ऋतूला देखील सुरुवात होते. ही एक पुराणातील आख्यायिका आहे. तसेच रामायण काळामध्ये प्रभू श्री राम जेव्हा रावणाचा वध करून पुन्हा अयोध्याकडे आले होते. त्यावेळेस अयोध्यावासीयांनी गुढीपाडव्याच्या दिवशी गुढ्या उभारून श्रीरामांचे स्वागत केले होते. अशा या गुढीपाडव्याबद्दल पुराणामध्ये या दोन आख्यायिका आहेत, असं ज्योतिषाचार्य जितेंद्र गलांडे यांनी सांगितले.
शुभ मुहूर्त
यावर्षी 22 मार्च 2023 रोजी गुढीपाडवा हा सण येत असून सकाळी 6.29 ते 7. 39 या मुहूर्तावरती सर्वांनी गुढी उभारावी. ही गुढी आपल्या घराकडे तोंड करून उभरावी. या गुढीवरती तांब्याचा कलश, नवीन वस्त्र, कडूलिंबाचा पाला, साखरगाठ बांधलेली असावी. त्यावर हळदीकुंकू वाहवे. गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वांनी आपल्या घरी पुरणपोळी अथवा इतर गोडधोड पदार्थ बनवावेत आणि त्याचा गुढीला आणि देवाला नैवेद्य दाखवावा. गुडीपाडव्याच्या शुभेच्छा दयाव्यात.
कडुलिंबाच्या पाल्याला विशेष महत्त्व
गुढीपाडव्याच्या दिवशी सोने खरेदीला आणि कडुलिंबाच्या पाल्याला विशेष महत्त्व असते. गुढीपाडवा हा सण साडेतीन मूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो. या मुहूर्तावरती कोणतेही चांगली खरेदी केलेली अथवा कोणतेही चांगले काम सुरू केले तर ते दीर्घायू टिकून राहते. यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी सोने खरेदी केले जाते. तसेच ज्यांना व्यवसायात वृद्धी करायची असेल त्यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन व्यवसाय सुरू करावा.
Gudi Padwa 2023 : पाडव्याला विशेष महत्त्व असलेली साखरेची गाठ कशी तयार होते? पाहा Video
तसेच गुढीपाडव्याच्या दिवशी आपण गुढीला कडूलिंबाचा पाला बांधतो. तसेच या दिवशी गुळ आणि कडुलिंबाच्या पाल्याचा प्रसाद देखील खाल्ला जातो. याबाबत अशी मान्यता आहे की, कडुलिंब हे आरोग्याला चांगले असते आणि गुढीपाडव्याच्या दिवशी हा पाला खावा. तसेच उन्हाळा सुरू असल्यामुळे कडुलिंबाच्या पाल्याने शरीर शांत आणि शुद्ध होण्यास मदत होते. घराच्यादाराला कडुलिंबाचा पाला बांधल्यामुळे त्याच्याद्वारे येणाऱ्या वाऱ्यामुळे घरात देखील निरोगी वातावरण राहते, असंही जितेंद्र गलांडे यांनी सांगितले.
गुढीला कलश उलटा का असतो?
गुढीवरती जो आपण कलश लावतो तो कलश हा ब्रम्हध्वजाचे प्रतीक म्हणून मानले जाते. ज्या कलशातून साखरगाठ नवीन वस्त्रे कडुलिंबाचा पाला अशा विविध गोष्टी आपल्या घरी समृद्धी यावी यासाठी बांधल्या जातात. या सर्वांचे प्रतीक म्हणून हा कलश उलटा ठेवला जातो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gudi Padwa 2023, Local18, Pune, Religion