पुणे, 10 फेब्रुवारी : सध्या कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीवरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. कसबा मतदारसंघातील बंडखोरी मोडण्यात महाविकास आघाडीला यश आलं आहे. मात्र चिंचवड मतदारसंघात महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे. एकीकडे ठाकरे गटाचे बंडोखोर उमेदवार राहुल कलाटे हे निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत तर दुसरीकडे संभाजी ब्रिगेड देखील या निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. त्यामुळे आता ठाकरे गट आणि महाविकास आघाडीसमोर दुहेरी संकट निर्माण झालं आहे. या बंडखोरीचा फटका त्यांना निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे. राहुल कलाटे निवडणूक लढवण्यावर ठाम राहुल कलाटे आणि संभाजी ब्रिगेडने ठाकरे गटाचं टेन्शन वाढवलं आहे. राहुल कलाटे यांच्यासोबतच संभाजी ब्रिगेड देखील चिंचवड पोटनिवडणूक लढवण्यावर ठाम आहे. त्यामुळे आता राहुल कलाटे आणि संभाजी ब्रिगेडचे उमेदवार प्रवीण कदम यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी ठाकरे गटाकडून प्रयत्न सुरू आहेत. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. सचिन आहेर यांची शिष्टाई फळाला येणार का? हे आता पहावं लागणार आहे. हेही वाचा : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा ‘सर्जिकल स्ट्राईक’, अधिवेशनाआधीच 15 आमदार फुटणार! चिंचवडमध्ये तिरंगी लढत चिंचवडमध्ये भाजपकडून अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र बंडखोर उमेदवार राहुल कलाटे हे देखील पोटनिवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. त्यामुळे आता चिंचवडमध्ये अश्विनी जगताप, नाना काटे आणि राहुल कलाटे असा तिरंगी सामना होण्याची शक्यता आहे. बंडखोरीचा फटका महविकास आघाडीला बसू शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.