मराठी बातम्या /बातम्या /पुणे /BREAKING: क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील पंच किरण गोसावी पुणे पोलिसांच्या ताब्यात

BREAKING: क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील पंच किरण गोसावी पुणे पोलिसांच्या ताब्यात

किरण गोसावी पुणे पोलिसांच्या ताब्यात (File Photo)

किरण गोसावी पुणे पोलिसांच्या ताब्यात (File Photo)

एनसीबीचे वादग्रस्त पंच किरण गोसावी पुणे पोलिसांच्या ताब्यात.

पुणे, 28 ऑक्टोबर : मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील पंच असलेला किरण गोसावी (Kiran Gosavi) याला पुणे पोलिसांनी (Pune Police) ताब्यात घेतले आहे. क्रूझ ड्रग्ज प्रकरणात पंच असलेला किरण गोसावी गेल्या अनेक दिवसांपासून फरार होता. किरण गोसावी याच्याविरोधात विविध पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत. अखेर पुणे पोलिसांनी किरण गोसावी याला ताब्यात घेतलं आहे. (Pune Police detained Kiran Gosavi a NCB witness in cruise drug case)

गेल्या 15 दिवसांपासून किरण गोसावी पोलिसांना गुंगारा देत होता. आता त्याला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले असून अटकेची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

किरण गोसावी हा उत्तर प्रदेशमधील लखनऊमध्ये लपून बसला असल्याचे समोर आले होते. सोमवारी रात्री तो पोलिसांना शरण येणार होता. लखनौ येथील मंडियांव पोलीस आयुक्तालयात तो हजर होणार होता. पण सोमवारी रात्री उशिरापर्यंत तो काही आलाच नाही. पुणे पोलिसांचं पथक पोहोचण्याआधीच गोसावी लखनऊमधून पळून गेल्याची माहिती समोर आली होती.

वाचा : समीर वानखेडेंची जवळपास साडे चार तास चौकशी

दरम्यान, त्याआधी किरण गोसावीने क्रुझवर कशा प्रकारे कारवाई केली होती आणि प्रभाकर साईलने केलेल्या आरोपांबाबत CNN News 18 शी बोलताना खुलासा केला होता. 'क्रुझवर जेव्हा कारवाई करण्यात आली होती, त्याआधी मला माझ्या खबऱ्याकडून माहिती मिळाली होती. त्यानुसार मी एनसीबीला माहिती दिली होती. त्यानंतर क्रुझवर कारवाई करण्यात आली होती. आर्यन खानसोबत जो सेल्फी काढला होता, तो सेल्फी एनसीबीच्या ऑफिसमध्ये काढला नव्हता तर तो क्रुझवर काढला होता, असा दावाही गोसावी याने केला आहे.

वाचा : नवाब मलिक यांच्याविरोधात FIR दाखल, राष्ट्रीय महिला आयोगाला विनंती पत्र

किरण गोसावीवर गुन्हे दाखल

किरण गोसावीवर आधीच विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. पुणे पोलीस त्याचा शोध घेत आहे. पुणे पोलिसांच्या रेकॉर्डवर तो फरार आरोपी आहे. मलेशियातील हॉटेलमध्ये नोकरी लावतो म्हणून किरण गोसावी याने 3 लाख रूपये उकळल्याचा गुन्हा चिन्मय देशमुख यांनी 2018 साली पुणे पोलिसात दाखल केला होता. त्याच्या शोधासाठी पुणे पोलिसांनी दोन पथक तयार केली होती. किरण गोसावीवर ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यातही फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे तर तिसरा गुन्हा अंधेरीतील पोलीस ठाण्यात दाखल आहे.

किरण गोसावीच्या असिस्टंटला अटक

तर दुसरीकडे, काही दिवसांपूर्वी याच फसवणुकीच्या गुन्हात फरार असलेल्या किरण गोसावीच्या असिस्टंटला पुणे पोलिसांनी अटक केली होती. शेरबानो कुरेशी असं या महिला असिस्टंटचे नाव आहे. 2018 मध्ये पुण्यातील चिन्मय देशमुख नावाच्या तरुणाची मलेशियात नोकरी लावतो म्हणून किरण गोसावी आणि शेरबानो कुराशी यांनी तीन लाखांची फसवणूक केली होती. त्यानंतर 2018 मधे दोघांवर पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. याच गुन्हयात पुणे पोलिसांनी शेरबानो कुरेशीला मुंबईतून अटक केली होती.

First published:

Tags: Pune