पुणे, 12 मार्च: पुण्यामध्ये कोरोनाची आकडेवारी काहीशी चिंताजनक (Coronavirus in Pune) आहे. देशभरात ज्या जिल्ह्यामध्ये कोरोनाचे रुग्ण सर्वाधिक आहेत, त्यापैकी पुणे देखील एक आहे. अशावेळी पुण्यामध्ये काही कडक निर्बंध लागू करण्यात येत आहेत. पुण्यामध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला नसून कडक निर्बंध आणले जाणार आहेत. विभागीय आयुक्तांनी पत्रकार परिषदेमध्ये याबाबत माहिती दिली. नागरिकांनी कोविडच्या नियमांचं पालन करावं असं आवाहन त्यांनी केलं आहे. शिवाय प्रशासनाचं कडक लक्ष देखील असल्याचं ते म्हणाले. विभागीय आयुक्तांनी अशी माहिती दिली आहे की 31 मार्चपर्यंत शाळा बंद राहणार आहेत. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना यातून सवलत देण्यात आली आहे. शिवाय सर्वेक्षण आणि Contact Tracing देखील सुरू करण्यात येणार आहेत. पालकमंत्र्यांबरोबरच्या बैठकीत हे निर्बंध निश्चित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. या निर्बंधांनुसार, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट रात्री 10 वाजता बंद करण्यात येतील शिवाय एकूण ते क्षमतेच्या 50 टक्के ग्राहकांनाच त्यांची सेवा देऊ शकतात. याठिकाणाहून पार्सल सेवा 11 पर्यंत सुरू राहणार आहे. शुक्रवारी 12 मार्च 2021 म्हणजेच आज रात्रीपासून हे कडक निर्बंध लागू केले जाणारा आहेत. (हे वाचा- ‘नवा व्हायरस नव्हे तुम्ही जबाबदार’, केंद्राने सांगितलं रुग्णवाढीचं कारण ) पुण्यात रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत संचार निर्बंध लागू राहणार आहेत. विविध ठिकाणच्या बागा संध्याकाळी बंद राहणार आहेत. कुठल्याही कौटुंबिक कार्यक्रमात 50 पेक्षा जास्त जण सहभागी होऊ शकत नाही, अशीही माहिती विभागीय आयुक्तांनी दिली आहे. (हे वाचा- महाशिवरात्रीला त्रैलोकीचा राजा सुना सुना! जेजुरी गडावर शुकशुकाट पाहा PHOTO ) मॉल्स आणि सिनेमागृह रात्री दहा वाजताच बंद होणार आहेत. शिवाय टपरी किंवा सार्वजनिक रस्त्यावर पाचपेक्षा अधिक लोकांना उभं राहता येणार नाही आहे, तसंच सोसायटीतील क्लब हाउस देखील बंद करण्यात आले आहेत. लायब्ररीमध्ये देखील 50 टक्के क्षमतेने लोकांना जाता येणार आहे. या दरम्यान ऑफिसेमधील कामकाज त्यांच्या वेळेनुसार सुरू राहणार आहे. राज्यात पुणे, नागपूर, ठाणे, मुंबई, अमरावती, जळगाव, नाशिक आणि औरंगाबाद या आठ जिल्ह्यांमध्ये देशातील सर्वात जास्त ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. त्यातही पुण्यात 18,474 इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. त्यानंतर अनुक्रमे नागपूर, ठाणे आणि मुंबईचा क्रमांक लागतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.