मुंबई, 11 मार्च : महाराष्ट्रातल्या कोरोनाच्या आकडेवारीनं (coronavirus case in maharashtra) आता केंद्राचं टेन्शन वाढवलं आहे. देशातील सर्वाधिक नवे आणि अॅक्टिव्ह कोरोना रुग्णही महाराष्ट्रातच आहेत. राज्यात कोरोनाचा नवा स्ट्रेनही दिसून आला आहे. यामुळे तर राज्यातील कोरोना रुग्णांचा आलेख वाढत तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित होतो आहे. मात्र केंद्रानं यामागील नेमकं कारण काय आहे ते सांगितलं आहे. विशेषतः यासाठी नवा व्हायरस नव्हे तर तुम्हीच जबाबदार आहात, असं म्हणत केंद्र सरकारने महाराष्ट्रावर ताशेरे ओढले आहेत.
सध्या देशात 1,89,226 अॅक्टिव्ह कोरोना केसेस आहेत. केरळमध्ये अॅक्टिव केसेस कमी होत असताना महाराष्ट्रात मात्र हे प्रमाण दुपटीनं वाढलं आहे. महाराष्ट्रात एक लाखांपेक्षा अधिक अॅक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. देशातील सर्वाधिक अॅक्टिव्ह केसेस असलेल्या दहा जिल्ह्यांपैकी आठ जिल्हे फक्त महाराष्ट्रातच आहेत.
ICMR चे महासंचालक डॉ. बलराम भार्गव म्हणाले, महाराष्ट्राची परिस्थिती खूप वाईट आहे. हा कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा परिणाम नाही. तर कमी प्रमाणात टेस्टिंग , ट्रॅकिंग आणि ट्रेसिंगमध्ये कमतरता आणि कोरोना नियमांचं उल्लंघन, बेजबाबदारपणा हेच यासाठी कारणीभूत आहे.
हे वाचा - देशातील सर्वाधिक ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असलेले 10 पैकी 8 जिल्हे फक्त महाराष्ट्रात
सर्वाधिक अॅक्टिव्ह कोरोना रुग्णांबाबत महाराष्ट्रानंतर मध्य प्रदेश, गुजरात, हरयाणाचा क्रमांक लागतो. महाराष्ट्र, केरळ, पंजाब, कर्नाटक, गुजरात, तामिळनाडूत सर्वाधिकत नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. देशातील एकूण नव्या कोरोना प्रकरणांपैकी तब्बल 85.91 टक्के प्रकरणं या राज्यांतील आहेत. दिवसभरात एकूण 22,854 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी सर्वाधिक 13,659 प्रकरणं महाराष्ट्रात आहेत. त्यानंतर केरळात 2,475 आणि पंजाबमध्ये 1,393 प्रकरणं आहेत.
हे वाचा - लॉकडाउन लावण्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मोठे विधान, म्हणाले....
नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के पॉल म्हणाले, महाराष्ट्रातील कोरोनाच्या वाढत्या नव्या प्रकरणांमुळे आता चिंता वाढली आहे. ही खूप गंभीर परिस्थिती आहे. आपल्याला यातून दोन गोष्टी शिकायला हव्यात. एक म्हणजे व्हायरसबाबत बेजबाबदार राहू नका आणि दुसरं म्हणजे जर आपल्याला कोरोनामुक्त राहायचं असेल तर कोरोना नियमांचं पालन करावंच लागेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Corona virus in india, Coronavirus