महाशिवरात्रीसारख्या दिवशीही खंडेरायाच्या जेजुरी गडावर अगदी सामसूम दिसून आली. कोरोनाचा विळखा वाढल्यानं शासकीय आदेशानुसार जेजुरी गडावर भाविकांविना महाशिवरात्री साजरी करण्यात आली.
महाशिवरात्री निमित्ताने आज आकर्षक अशा विविध रंगांच्या फुलांनी सजवून खंडोबाची पूजा बांधण्यात आली होती. खंडोबाची प्रतिमा अतिशय आकर्षक भासत होती.
गेली वर्षभर जगभरात कोरोनाची महामारी सुरु आहे. अजूनही कोरोनचा धोका तसाच आहे, त्यामुळे शासनाकडून सार्वजनिक सणासुदीवर बंदी घालण्यात आली आहे. आणि म्हणूनच जेजुरी गडावर हा शुकशुकाट दिसून येत आहे.
जेजुरी गडावरील नित्य वारकरी, पुजाऱ्यांनी गडावरील शिवलिंगांची महापूजा, अभिषेक आणि आरती करून महाशिवरात्रीचा सण साजरा केला.
पहाटे अडीच वाजता जेजुरी गडावरील मुख्य गाभारा, गाभाऱ्यातील उजवीकडील तळघरातील गुप्तलिंग, आणि शिखारातील शिखरलिंग उघडण्यात आलं होतं.
शिखर लिंग , घाभाऱ्यातील लिंग आणि तळघरातील गुप्त लिंग यांना अनुक्रमे स्वर्गलोक, भूलोक आणि पाताळलोक येथील शिवलिंगांचे दर्शन घडतं असं मानलं जातं.
कोरोनामुळे खबरदारी म्हणून शासनाने ह्या सर्व उत्सवांवर बंदी आणली असल्याने. तीन दिवस जेजुरी गडावर जमावबंदी जाहीर केली आहे. त्यामुळे कोणत्याच भाविकांना आज याठिकाणी प्रवेश देण्यात आला नाही.