पुणे, 18 मे : स्मृती इराणी (Smriti Irani) यांच्या पुण्यातील कार्यक्रमात झालेल्या राड्यानंतर आज पुन्हा एकदा भाजप (BJP) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) कार्यकर्ते रस्त्यावर उतल्याचं पहायला मिळालं. पुण्यात भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली.
पुण्यातील बालगंधर्व चौकात महाविकास आघाडीतर्फे मूक आंदोलन सुरु आहे. तर याच वेळी पुण्यातील अल्का चौकात भाजप कार्यकर्ते पदाधिकारी आक्रमक पद्धतीने आंदोलन करतांना दिसत आहेत. रविवारी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमा दरम्यान राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांना भाजप पदाधिकाऱ्याकडून मारहाण झाली होती, त्याचा निषेध म्हणून महाविकास आघाडी आंदोलन करत आहे. तर महाविकास आघाडी गुंडगिरी करत असल्याचा आरोप करत भाजप रस्त्यावर आंदोलन करत आहे.
भाजप कार्यकर्त्यांच्या कृत्यावर सुप्रिया सुळे संतापल्या
पुण्यात भाजपच्या नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात घोषणाबाजी करणाऱ्या राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (ncp mp supriya sule) यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. 'महाराष्ट्रात यापुढे महिलेवर कुठल्याही पुरुषाने हात उभारल्यास त्याचा हात तोडून मी त्याच्याच हातात देईल असा इशारा सुप्रिया सुळे यांनी दिला. जळगावमध्ये महागाईच्या विरोधात राष्ट्रवादीने आंदोलन केले होते. यावेळी खासदार सुप्रिया सुळे उपस्थितीत होत्या. पदाधिकाऱ्यांशी बोलत असताना पुण्यातील घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला.
फडणवीसांचा सुप्रिया सुळेंना सवाल
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हात तोडण्याचा इशारा दिला आहे. त्यानंतर, 'ज्यावेळी खासदार नवनीत राणा यांच्यावर कारवाई झाली त्यावेळी का बोलल्या नाही, असा सवाल भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत असताना देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या टीकेला उत्तर दिले आहे.
'सुप्रिया ताई यांनी ज्या प्रकारे भूमिका मांडली, ती त्यांनी सगळ्याच बाबतीत घेतली पाहिजे. नवनीत राणा यांच्यावरही कारवाई झाली होती, त्यावेळी त्या काही बोलल्या नाही. मध्यंतरीच्या काळात आमच्याही महिलांवर असे हल्ले झाले होते, पोलिसांनी त्यावेळी वाईट वागणूक दिली होती. सुप्रिया सुळे यांनी जर याबद्दल भूमिका घेतली तर मी त्यांचं स्वागत करेल, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.