पुणे, 4 जुलै : महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा राजकीय भूकंप झाला आहे. अजित पवारांनी केलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये फूट पडली आहे. अजित पवारांसोबत राष्ट्रवादीच्या 8 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. महाराष्ट्रात सुरू असलेल्या या घडामोडींवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावरच निशाणा साधत जुना इतिहास बाहेर काढला आहे. ‘जे झालंय ते अत्यंत किळसवाणं आहे. महाराष्ट्रातल्या जनमताचा कानोसा घेतला तर प्रत्येक घरात शिव्या ऐकायला मिळतील. हा मतदारांचा घोर अपमान आहे. या सगळ्या गोष्टींबद्दल मेळाव्यात बोलणार’, असं राज ठाकरे म्हणाले आहेत. ‘या सगळ्या गोष्टींची महाराष्ट्रात शरद पवारांनी सुरूवात केली. त्यांनी पहिला पुलोदचा प्रयोग केला 78 साली, तेव्हा काय केलं? त्याआधी महाराष्ट्रात असं कधी झालं नव्हतं. या सगळ्या गोष्टींची सुरूवात पवार साहेबांकडून झाली शेवट पवार साहेबांकडून झाला’, असंही राज ठाकरे यांनी सांगितलं. पवार विरुद्ध पवार, नाशिकमध्ये पहिला संघर्ष, राष्ट्रवादीच्या कार्यालयावरून कार्यकर्ते भिडले, Video ‘बहुदा त्यांनीच हे पेरलं आहे. प्रफुल पटेल, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ हे अजित पवारांबरोबर जाणारी माणसं नाहीत. ही तीन माणसं मला संशयास्पद वाटतात, कारण अजित पवारांसोबत जाऊन मंत्रिपदं स्वीकारतील’, असा संशयही राज ठाकरे यांनी व्यक्त केला. ‘ही गोष्ट अचानक घडली असं नाही, हे कित्येक दिवस हे सुरू होतं. वातावरणामध्ये चालू होतं, काल ते दिसलं. अजित पवारांनी स्टेटमेंट केलं होतं, शरद पवारांचे फोटो सर्व होर्डिंगवर लावा. हे सगळं अनाकलनीय आहे. उद्या सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री झाल्या तर आश्चर्य वाटणार नाही’, अशी प्रतिक्रियाही राज ठाकरे यांनी दिली. उद्धव ठाकरेंसोबत एकत्र येण्याबाबतही राज ठाकरेंना विचारण्यात आलं तेव्हा आमच्या बैठकीत अशी कोणतीही मागणी झाली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. इतका चुकीचा कॅरम फुटला आहे, कुणाच्या सोंगट्या कुणाच्या भोकात आहेत ते कळत नाहीये. कोण कुठच्या पक्षात आहे याचा पत्ताच लागत नाही, घड्याळाने काटा काढला का काट्याने घड्याळ काढलं मला माहिती नाही, असा टोलाही राज ठाकरे यांनी लगावला आहे. ‘जिवंतपणी माझा फोटो…’, शरद पवारांचा अजितदादांना कडक इशारा
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.