नाशिक, 4 जुलै : एका वर्षाच्या आत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दुसरा भूकंप झाला आहे. अजित पवारांनी 9 आमदारांसह घेतलेल्या मंत्रिपदाच्या शपथीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. अजित पवार यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आणि घड्याळ याच चिन्हावर दावा केला आहे, तसंच आपल्याला बहुसंख्य आमदारांचा पाठिंबा असल्याचंही अजित पवार म्हणाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेला हा संघर्ष आता रस्त्यावर आला आहे. नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावरून अजित पवार आणि शरद पवार गट आमनेसामने आले आहेत. नाशिकमध्ये शरद पवार गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या कार्यालयावर दाखल झाले. शरद पवार गटाचे पदाधिकारी बैठक घेण्यावर ठाम आहेत, पण बैठकीसाठी राष्ट्रवादी कार्यालयात येऊ देणार नाही, असा इशारा अजितदादा आणि भुजबळ गटाने दिला आहे. दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमधला संघर्ष टाळण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर दंगल नियंत्रण पथकही तैनात करण्यात आलं आहे.
दुसरीकडे मुंबईमध्ये राष्ट्रवादीच्या नव्या पक्ष कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते या कार्यालयाचं उद्घाटन केलं गेलं. मंत्रालयासमोरच राष्ट्रवादीचं हे नवीन कार्यालय असणार आहे. या कार्यालयाच्या उद्घाटनावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. फोटो वापरू नका, पवारांचा इशारा दरम्यान शरद पवारांनी अजित पवारांच्या गटाने आपला फोटो वापरू नये असा इशाराही दिला आहे. ‘माझा फोटो माझ्या परवानगीनेच वापरावा. ज्यांनी माझ्या विचारांशी द्रोह केला, ज्यांच्याशी माझा आता वैचारिक मतभेद आहे. जिवंतपणी माझा फोटो कुणी वापरावा हा माशा अधिकार आहे. त्यामुळे मी ज्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे, ज्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आहेत, त्या पक्षाने माझा फोटो वापरवा. अन्य कुणीही माझा फोटो वापरू नये,’ असं शरद पवार म्हणाले आहेत.