पुणे, 11 जुलै: लोणावळा (Lonavala) येथे काँग्रेस (Congress) कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. यावेळी स्वबळाच्या नाऱ्यावर मी ठाम असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी ठणकावून सांगितलं. तसंच यावेळी पटोले यांनी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर थेट टीका केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) स्वबळाचा नारा देऊन शिवसैनिकांना कामाला लागा, अशा सूचना दिल्या. मुख्यमंत्री आदेश देतात ते चालते आणि मी स्वबळावर बोललो की त्यांना त्रास होतो, हे योग्य नाही. स्वबळाच्या घोषणेवर मी ठाम असल्याचा पुनरुच्चार नाना पटोले यांनी केला आहे. अजित पवारांवरील नाराजी उघड पुण्याचे पालकमंत्री हे बारामतीकर आहेत. अजित पवार काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची कामं करत नाही, असं म्हणत नाना पटोले यांनी अजित पवारांवरील नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे. यात संपर्कमंत्र्यांनी लक्ष घालावं असं आपण म्हणतो पण शेवटी त्यांचं ऐकायचं की नाही हेसुद्धा तेच ठरवतात. कोणत्याही समित्यांवर नावे पाठवायची असतील तर तिथे संपर्कमंत्र्यांची नाही तर पालकमंत्र्यांची सही लागते. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन आपली ताकद कशी वाढेल याकडे लक्ष केंद्रीत करा, असे पटोले यांनी मेळाव्यात म्हटलं आहे. काँग्रेसने स्वबळावर निवडणुका लढल्या पाहिजेत या म्हणण्यावर मी ठाम आहे. आता माघार घेणार नाही. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यादृष्टीने कामाला लागावे, असे आवाहन पटोले यांनी केले. ज्यांना समजोता करायचा नसेल आणि सोबत राहून पाठीत सुरा खुपसायचं असेल त्यांना आपण काही बोलायचं नाही. पण तो राग आपली ताकद बनवा आणि पुण्यात आपला पालकमंत्री होईल अशी शपथ घ्या, असं आवाहन पटोले यांनी केलं. हेही वाचा- पुण्यात पर्यटनस्थळी गर्दी करणं पडलं महागात, 400 जणांवर कारवाईचा बडगा नाना पटोलेंनी उघडपणे महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांना लक्ष्य केल्याने येत्या काळात महाविकास आघाडीतील तणाव वाढण्याची शक्यता आहे. फोन टॅपिंग प्रकरण 2016-17 मध्ये माझा फोन टॅप ( Phone Tapping Case) चकरण्यात आला होता, असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशना दरम्यान केला. माझ्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आलं होतं. माझा फोन टॅप करुन माझं नाव अमजद खान असं ठेवलं गेलं, असंही पटोले यांनी म्हटलं होतं. हेही वाचा- चिंताजनक! देशातल्या कोरोना संक्रमणासंदर्भात धक्कादायक खुलासा पटोलेंच्या आरोपानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारकडून पोलिस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली 3 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती फोन टॅपिंग प्रकरणी चौकशी करून 3 महिन्यात आपला अहवाल सादर करेल. नाना पटोले यांनी फोन टॅपिंगचे आरोप केल्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.