पुणे, 13 नोव्हेंबर: सगळीकडे दिवाळीची धामधूम सुरू असताना पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. ऐन दिवाळीत पुण्यात मोठा शस्त्रसाठा सापडला आहे. गावठी पिस्तूल आणि काडतुसं विकणाऱ्या लादेन टोळीला स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून 11 पिस्तुल आणि 31 काडतुसं जप्त करण्यात आले आहेत.
बारक्या उर्फ प्रमोद पारसे, राजू जाधव, बल्लूसिंग पारसे, लादेन उर्फ सोहेल मोदीन आसंगी, संदीप धुमाळ अशी अटक करण्यात आलेल्याची नावे आहेत.
हेही वाचा..ओवैसींवर भडकले उर्दू कवी, म्हणाले.. ते दुसरे जिनाच, मुस्लिमांची मतं विभागतात
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खुनाचा प्रयत्न करणारा स्वारगेट पीएमपीएल बसस्टॉपवर असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक सुरेश जायभाय, कर्मचारी ज्ञाना बडे, मानिज भोकरे यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून बारक्या उर्फ प्रमोदला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 2 पिस्तुल आणि 4 काडतुसं जप्त करण्यात आली. चौकशीत त्याने राजू जाधव याने 13 गावठी पिस्तुल बल्लूसिंग याच्याकडून आणल्याची माहिती मिळाली.
ऐन दिवाळीत सापडला मोठा शस्त्रसाठा, पुण्यात लादेन टोळीला अटक #Pune #punepolice pic.twitter.com/FvLJH2cThO
— News18Lokmat (@News18lokmat) November 13, 2020
त्यानुसार पोलिसांनी राजुला ताब्यात घेऊन 5 पिस्तुल आणी 15 काडतुसे जप्त केली. त्याशिवाय बल्लूसिंग याच्याकडून 1 पिस्तुल आणि 4 काडतुसे जप्त करण्यात आली. त्यानंतर लादेन उर्फ सोहेल याला ताब्यात घेऊन 3 पिस्तुल आणि 8 काडतुसे जप्त करण्यात आली. सर्व आरोपींना अटक करून त्यांच्याकडून 11 पिस्तुल आणि 31 काडतुसं जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी दिली आहे.
दुसरीकडे, नाशिक शहरात आता महिला गॅंग अर्थात महिला चोराची टोळी सक्रीय झाली आहे. दिवाळीच्या गर्दीचा फायदा घेत बाजारपेठेत चोरटे आपले हात साफ करून घेत आहेत. गर्दीचा गैरफायदा घेत काही महिलांच्या टोळ्याही सक्रिय झाल्या आहेत. नाशिक शहरातील मेनरोड परिसरात एका दुकानातून महिलेच्या पर्समधून 20 हजार रुपयांची रोकड एका महिलेनं लांबवली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. मात्र, वाढत्या गुन्हेगारीवर आळा बसवण्यात पोलिस अपयशी ठरले आहेत.
प्रचंड गर्दिनं भरलेली बाजारपेठ... जागोजागी सुरू असलेले सेल... कपडे, वस्तू, साहित्य, मिठाई खरेदीसाठी उडालेली झुंबड... असं सद्या नाशिक शहरातील चित्र आहे. मास्कचा वापर करणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असली तरी सोशल डिस्टंसिंगचा पार फज्जा उडाला आहे. याच परिस्थितीचा गैरफायदा काही गुन्हेगारी वृत्तीच्या महिला घेत आहेत.
महिलांच्या पर्स लांबवल्या जात आहेत. पुरुषांचं पाकीट गायब होत आहे. पैसेच नाही तर नागरिकांचे साहित्यही चोरीला जात आहे. अशा घटनांमध्ये शहरात वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर आता पोलिसांनीही कंबर कसली आहे. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीसही रस्त्यावर उतरले आहेत.
हेही वाचा...राज्यातील मोठ्या GST Scam मध्ये आमदाराच्या मुलाला अटक; 520 कोटी रुपयांचा घोटाळा
पोलिसांनी लढवली नवी शक्कल..
नाशिक पोलिसांनी आता इनव्हिजिबील पोलिसिंग सुरू केलं आहे. सिव्हिल ड्रेसमध्ये अनेक पुरुष आणी महिला कर्मचारी दिवाळीच्या गर्दीत मिसळून फिरत आहे. संशयास्पद महिला असो की पुरुष, त्यांना तातडीनं ताब्यात घेण्यात येत आहे. याचा फायदा होत असला तरी गर्दीत घडणारे लुटीचे गुन्हे सुरूच आहे. प्रत्येक नागरिकांनंही गर्दीत फिरतांना जागरूक असावं, असं पोलीस आवाहन करताना दिसत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Maharashtra, Pune, Pune crime, Pune police